धाराशिव (प्रतिनिधी)-  शहरातील खड्ड्यामुळे नागरिकांचे जीवन धोक्यात आले असून या खड्ड्यामुळे एका तरुणाचा नाहकपणे बळी गेला आहे. त्यामुळे येत्या 8 दिवसांत संपूर्ण शहरातील खड्ड्यांची दुरुस्ती करावी. जर दुरुस्तीच्या नावाखाली फक्त मलमपट्टी करण्याचे काम केले तर राष्ट्रवादी काँग्रेस नगरपरिषद व बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी रविवारी (दि.20) जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

या निवेदनात दुधगावकर यांनी नमूद केले आहे की, धाराशिव शहरासह जिल्ह्यातील मुख्य रस्त्यांसह ग्रामीण भागातील मुख्य प्रत्येक रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य गेल्या 2 वर्षांपासून पसरलेले आहे. त्यामुळे जनता मरण यातना भोगत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने या संदर्भात सातत्याने संपूर्ण जिल्ह्यातील रस्त्यांतील खड्डे बुजवावेत यासह इतर विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलने केली आहेत. परंतू गेंड्याची कातडी पांघरलेल्या प्रशासनाने त्याची दखल न घेता येरे माझ्या मागल्या याप्रमाणे हो करतो या गोंडस नावाखाली आजपर्यंत कुठल्याही प्रकारची रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पावले उचलली नाहीत. त्यामुळे या खड्ड्यात दि.17 ऑक्टोबर रोजी ओंकार जाधवर या युवकाचा नाहकपणे बळी घेण्याचे काम केले आहे. तसेच शेकडो महिला, मुले व नागरिक देखील या रस्त्यांवरील पडलेल्या खड्ड्यामुळे अपघात होऊन जखमी झालेले आहेत. हा विषय जिल्हाधिकारी यांनी अत्यंत गांभीर्याने घेवून संबंधित बांधकाम विभागाचे अधिकारी व नगर परिषदेचे अधिकारी यांना तात्काळ आदेशित करून रस्त्याची दुरुस्ती केवळ मलमपट्टी न करता चांगल्या पद्धतीने करावी असे आदेश द्यावेत, अशी मागणी दुधगावकर यांनी केली आहे.


 
Top