धाराशिव (प्रतिनिधी)- संतश्रेष्ठ गोरोबा काका यांच्या समाधी मंदिरासमोरील मुख्य सभामंडप पंढरपूर येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिरातील सागवानी सभामंडपाच्या धर्तीवर अधिक आकर्षक करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पर्यटन विभागाचा 4 कोटी रूपयांचा निधी त्यासाठी आपण मंजूर करवून घेतला आहे. पुढील काळात गोरोबा काकांच्या मुख्य मंदिराच्या गाभार्‍याचे कामही सामूदायिक जबाबदारीतून आपण सर्वजण मिळून नक्की यशस्वी करू, अशी ग्वाही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

रविवारी धाराशिव तालुक्यातील तेर येथे संत गोरोबा काका यांच्या समाधी मंदिरासमोरील सभा मंडपाच्या कामाचा शुभारंभ प्रकाश बोधले महाराज यांच्यासह संप्रदायातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. संतांच्या मांदियाळीत गोरोबा काकांचे स्थान मोठे आहे. मोठ्या आदराने त्यांचा उल्लेख संतश्रेष्ठ म्हणून केला जातो. काकांच्या मंदिराचा विकास करण्यासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून विविध विभागाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. उपलब्ध झालेल्या या निधीमधून प्रस्तावित असलेली सर्व प्रकारची विकासकामे करण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

यापुढील काळातही संतश्रेष्ठ गोरोबा काका यांच्या समाधी मंदिराप्रमाणेच पुरातन वारसा लाभलेल्या प्राचीन तेर नगरीतील ऐतिहासिक वारसा जतन आणि त्याचे संवर्धन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येईल. सध्या राज्यातील सर्वात जुने मंदिर, अशी ख्याती असलेल्या त्रिविक्रम मंदिराच्या जीर्णोध्दाराचे काम प्रगतीपथावर आहे. त्यानिमित्ताने तेर येथील समृध्द प्राचीन इतिहास पुन्हा एकदा जागतिक पातळीवर नोंदविण्याची संधी आपल्याला उपलब्ध झाली आहे. गोरोबा काकांचे मंदिर आणि परिसरातील कामे करण्यासाठी अपेक्षित असलेला निधी उपलब्ध करवून घेण्यात आपल्याला यश आले आहे. विविध विकासकामांच्या माध्यमातून मंदिर आणि परिसराचा कायापालट करण्याचे उद्दिष्ट आपण डोळ्यासमोर ठेवले आहे. आपल्या सर्वांचा मानबिंदू असलेल्या या तीर्थक्षेत्राला अ-दर्जा मिळावा, यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. हा दर्जा प्राप्त करवून घेण्यासाठी निर्धारित करण्यात आलेल्या निकषांची पूर्तता करण्याचे काम सध्या सुरू आहे. लवकरच संतश्रेष्ठ गोरोबा काकांच्या तीर्थक्षेत्राला अ दर्जा बहाल केला जाईल, असा विश्वासही आमदार पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी हभप प्रकाश महाराज बोधले, महादेव महाराज बोराडे, महादेव महाराज तांबे, योगेश महाराज इंगळे, दिपक महाराज खरात, परमेश्वर महाराज बोधले, सरपंच दिदी काळे, उपसरपंच श्रीमंत फंड, पद्माकर फंड, विश्वजीत पाटील आदीची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी अजीत कदम नवनाथ पसारे, प्रविण साळुंखे, किशोर काळे, राम कोळी, संजय लोमटे, सुधाकर बुकन, विष्णू एडके, मंगेश फंड, तानाजी बंडे,दत्ता मगर, आदींनी परिश्रम घेतले यावेळी मोठ्या प्रमाणावर वारकरी संप्रदायातील भक्त मंडळी उपस्थित होते.


सामूदायिक जबाबदारीतून दगडी गाभार्‍याचे काम

कार्यक्रमात उपस्थित असलेल्या वारकरी सांप्रदायातील ज्येष्ठ मान्यवरांनी यावेळी संत गोरोबा काका मंदिराचा मुख्य गाभारा दगडी असावा, अशी इच्छा व्यक्त केली. सध्या हा गाभारा विटांच्या बांधकामात आहे. मुख्य गाभारा दगडी बांधकामात करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून सामुदायिक जबाबदारीतून हे काम हाती घेवूया, त्यासाठी आपण स्वतः एक कोटी रूपयांची जबाबदारी घेत असल्याचे आमदार पाटील यांनी यावेळी जाहीर केले. आपल्या सर्वांच्या सहकार्यातून लवकरच मुख्य गाभारा अधिक आकर्षक आणि लक्षवेधी करण्यासाठी आपण सर्वजण मिळून आराखडा निश्चित करू, आणि त्यानुसार पुढील काम पूर्णत्वाकडे नेऊ, असेही आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले.

 
Top