धाराशिव (प्रतिनिधी)-शिक्षण हेच एकमेव साधन आहे. याद्वारे तुम्ही या अडचणींवर मात करून भविष्य घडवू शकता, असे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांनी सांगितले. 

एसटी बससेवेच्या अभावामुळे, दिरंगाईमुळे विद्यार्थिनींना शाळेत येण्यास विलंब होतो. गावातील लोक शाळेच्या मैदानावरच धुम्रपान करतात, काहीजण मैदानावर कचरा टाकतात, मासिक पाळीच्या काळात शाळेत आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना त्या दिवशी शाळा सोडून घरी जावे लागते. काही तरूणांच्या वागण्यामुळे मुलींना असुरक्षित वाटते आणि त्याचा अभ्यासात अडथळा येतो, या सुचना जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या आहेत. निमित्त होते जागतिक बालिका दिनानिमित्त जिल्हा परिषदेत विशेष चर्चेचे. 

जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता 7 वी, आठवीतील मुलींनी शैक्षणिक अडचणी आणि सामाजिक समस्यांवर मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांच्याशी चर्चा केली. यावेळी प्राथमिकचे शिक्षणाधिकारी अशोक पाटील, युनिसेफच्या मानसी आचार्य, स्वयंम शिक्षण प्रयोग व कोरो इंडिया संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते. सीईओंनी मुलींना प्रोत्साहित करत समाजातील या अडचणींवर उपाय शोधून या समस्या सोडवण्यासाठी सुचना अधिकाऱ्यांना केल्या.

मुलींनी पालकांना शेतीकामात मदत करण्यासाठी जावेत लागत असल्याने शिक्षणात कसे अडथळे येतात. मैनाक घोष यांनी समस्यांचे निराकारणासाठी जिल्हा परिषद प्रयत्न करणार असे आश्वासन मुलींना दिले. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि पुस्तकांसाठी निधी उभारायला मदत मिळावी म्हणून रीड टू ड्रीम ही मोहीम सुरू करण्यात आली. 

 
Top