धाराशिव (प्रतिनिधी) - गोवंश संवर्धन व तिचे जतन करण्यासाठी जगद्गुरु शंकराचार्यजी, अभिमुक्तेश्वरानंदजी महाराज यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून देशभरात जनजागृती व चळवळ मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्याला यश आले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोवंशासाठी म्हणजेच गायींसाठी प्रती दिन ५० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी १०० रुपये अनुदान देण्यात यावे. हे अनुदान फक्त गोशाळा रजिस्टर असलेल्यांनाच देण्यात येणार आहे. त्यामुळे इतर गो पालकांवर अन्याय होत असून ज्या शेतकऱ्याकडे एक गाय आहे, अशा सर्वांना सरसकट १०० रुपये विनाअट देण्याचा निर्णय आचारसंहिता लागण्यापूर्वी घेण्यात यावा, अशी मागणी गो सांसद प्रदेश संयोजक वैद्य नवनाथ दुधाळ यांनी केली आहे. दरम्यान, गोमातेला राज्य मातेचा दर्जा दिल्याबद्दल सरकारचे अभिनंदन देखील त्यांनी केले.
पुढे बोलताना वैद्य दुधाळ म्हणाले की, आम्ही गोमातेला दररोज १०० रुपये अनुदान देण्यात यावे यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करीत आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने नुकताच एक जीआर काढून ३ वर्षांपूर्वी रजिस्टर केलेल्या व त्यामध्ये ५० गायी असतील अशा गोशाळांना एका गायीसाठी प्रती दिन ५० रुपये अनुदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ही अट जाचक असून ज्या शेतकऱ्याकडे एक-दोन-तीन जेवढ्या गायी असतील त्या गायींना प्रती दिन १०० रुपये सरसकट अनुदान देणे आवश्यक आहे. जर ते नाही दिले तर त्या गायी कत्तलखान्यात जातील अशी भीती व्यक्त करून आचारसंहितेपूर्वी किमान गायींना वाचविण्यासाठी सरसकट म्हणजेच विनाअट प्रती दिन एका गायीसाठी १०० देण्याचा तात्काळ निर्णय अशी मागणी त्यांनी केली. तसेच हे ५० रुपये देण्यासाठी गो आयोग नेमला असून मंडळ स्थापन केले आहे. या मंडळाच्या माध्यमातून सर्वे करून दर सहा महिन्याला एक वेळेस अनुदान देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पन्नास रुपये देण्याचा निर्णय घेतला असल्याचा आरोप ही त्यांनी केला. रोज रोज नवीन प्रोजेक्ट उभा करता असे सांगत गो अनुदान देण्यास का भेदभाव करता ? असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे सरकारने तात्काळ सरसकट प्रती दिन १०० देण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी वैद्य दुधाळ यांनी केली.