नळदुर्ग (प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये तुळजापुर विधानसभा मतदार संघ हा काँग्रेसकडे असल्याने या मतदार संघात काँग्रेसचा उमेदवार कोण असणार याकडे तालुकावासियांचे लक्ष लागले आहे.
विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांकडुन आता आपापल्या उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. ही निवडणुक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यामध्ये होणार आहे.महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये तुळजापुर विधानसभा मतदार संघ हा काँग्रेसकडे असल्याने या मतदार संघात महाविकास आघाडीचा उमेदवार हा काँग्रेसचा राहणार आहे.त्यामुळे या मतदार संघात काँग्रेसचा उमेदवार कोण असणार हा सस्पेन्स आजही कायम आहे. वास्तविक पाहता 2019 पर्यंत तुळजापुर विधानसभा मतदार संघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणुन ओळखला जात होता. या मतदार संघात काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी मंत्री मधुकरराव चव्हाण हे सलग चार वेळेस आणि एकुन पाच वेळेस ते आमदार म्हणुन निवडुन आले आहेत. याहीवेळी मधुकरराव चव्हाण यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. मात्र यावेळी काँग्रेसकडुन उमेदवारी मागण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. यामध्ये अशोक जगदाळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. धीरज पाटील व देवानंद रोचकरी या दिग्गजांचा समावेश आहे. माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांना तिकीट मिळण्यामध्ये त्यांचे वय आणि लोकसभा निवडणुकीत त्यांचे चिरंजीव सुनिल चव्हाण यांनी केलेला भाजप प्रवेश हे अडचणीचे ठरत आहेत. मात्र मधुकरराव चव्हाण हे राज्यातील काँग्रेसचे जेष्ठ व अनुभवी नेते आहेत त्यामुळे पक्षश्रेष्टी त्यांना झुकता माप देणार का? हे पाहणे गरजेचे आहे.
नळदुर्गचे सुपुत्र व प्रसिद्ध उद्योगपती अशोक जगदाळे यांनीही काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे.सध्या उमेदवारीच्या रेसमध्ये अशोक जगदाळे हे नंबर एकवर असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. निवडुन येऊ शकणाऱ्या उमेदवाराला काँग्रेस प्राधान्य देत आहे. अशोक जगदाळे यांनी विधानपरीषद आणि 2019 ची विधानसभा निवडणुक मोठ्या हिमतीने व ताकदीने लढविली असल्याचा अहवालही काँग्रेस पक्षीश्रेष्टीकडे गेला आहे. त्याचबरोबर अशोक जगदाळे यांनी गेल्या दोन, तीन महिन्यात संपुर्ण मतदार संघात महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम, शेतकऱ्यांसाठी शेतकरी मेळावे व युवकांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करून तब्बल एक लाखांपेक्षा जास्त मतदारांशी थेट संवाद साधला आहे हेच त्यांच्यासाठी काँग्रेसचे तिकीट मिळण्यासाठी जमेची बाजु ठरत आहे. त्यामुळे तिकिटाच्या रेसमध्ये अशोक जगदाळे हे नंबर एकवर असल्याची माहिती मिळत आहे.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. धीरज पाटील यांनीही निष्ठावंत कार्यकर्ता म्हणुन पक्षाकडे मोठ्या मजबुतीने उमेदवारी मागितली आहे. त्याचबरोबर देवानंद रोचकरी यांनीही काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे. आता काँग्रेस पक्ष तुळजापुर विधानसभा मतदार संघातुन कुणाला उमेदवारी देणार हे पाहणे गरजेचे आहे.