धाराशिव (प्रतिनिधी) - पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला जगात तोड नाही. मातृशक्तीच्या कर्तृत्वाच्या क्षमता त्यांनी जगाला दाखवून दिल्या आहेत. स्वतःपुरते, जाती-धर्मापुरते मर्यादीत न राहता, व्यापक काम उभारले. काळाच्या पटलावर त्यांनी निर्माण केलेला ऊर्जादायी स्त्रोत आजही आपल्या सर्वांना प्रेरणा देत आहे. या स्मारकात नतमस्तक होवून, त्यांचे आशीर्वाद घेवून त्यांच्या विचाराचा वारसा आपण सर्वांनी प्राणपणाने जपायला हवा, असे प्रतिपादन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले.
तुळजापूर शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारक आणि पूर्णाकृती पुतळ्याचे भूमिपूजन आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर शहरातील श्रीनाथ मंगल कार्यालयात सकल धनगर समाजाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्काराला उत्तर देताना आमदार पाटील बोलत होते. नवरात्रीच्या पावन कालावधीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारक आणि पुतळ्याचे आपण भूमिपूजन केले आहे. पुतळा, उद्यान आणि स्मारक एवढ्यावर समाधान मानून चालणार नाही. समाजाच्या उत्कर्षासाठी या स्मारकात प्रशिक्षण केंद्र, मदत केंद्र सुरू करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वकाही सरकारी पैशातूनच व्हायला हवे, असे नाही. सामूदायिक जबाबदारीतून स्मारकाच्या बांधणीचा वाटा आपण सर्वांनी मोठ्या जबाबदारीने घ्यायला हवा. तुळजापूर शहरातील सहकाऱ्यांनी जागा उपलब्ध करून देत मोठे काम केले आहे. राज्यभरातून येणाऱ्या पर्यटकांना या स्मारकातून प्रेरणा मिळेल. येथे येवून ते नतमस्तक होतील आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे विचार आचरणात आणतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी विनोद गंगणे, गोकुळ शिंदे, सचिन रोचकरी, गणेश सोनटक्के, राम जवान, राजाभाऊ सोनटक्के, भारत डोलारे, दीपक आलुरे, आशिष सोनटक्के, सचिन घोडके, समर्थ पैलवान, प्रमोद दाणे, अविनाश गंगणे, दीपक घोडके, बालाजी गावडे, बाळासाहेब खांडेकर, बाबा श्रीनामे, अरविंद पाटील, नागेश बनसोडे, नवनाथ मारकड, रवी पाटील, उमेश गोरे, राजेंद्र तांदळे, आप्पासाहेब पाटील, संदीपान मोटे, नागेश हुंडेकरी, संजय देवकते यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.