धाराशिव (प्रतिनिधी)-तुळजापूर-सोलापूर महामार्गावरील सिंदफळ गावाजवळ औश्याकडे जाणारा लातूर रॉड जंक्शन उड्डाणपूल नसल्यामुळे अनेक अपघात झाले. दुर्दैवाने अनेकजणांना त्यामुळे कायमचे अपंगत्व देखील आले आहे. भविष्यात या परिसरात केवळ उड्डाणपूलाअभावी अपघाती परिस्थिती ओढावू नये, याकरिता आपण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. त्याला यश आले आहे. साधारणतः 19 कोटी रूपये खर्चून सिंदफळ येथील लातूर पर्यायी महामार्गावर जंक्शन उड्डाणपूल उभारला जाणार आहे. त्यामुळे स्थानिक वाहतुकीला आणि नागरिकांना त्याचा फायदा होणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
मंगळवार, 15 ऑक्टोबर रोजी सकाळी तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथे नागरिकांच्या शुभहस्ते व आमदार पाटील यांच्या उपस्थितीत उड्डाणपुलाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यातील रस्ते राष्ट्रीय महामार्गालगत असलेले पर्यायी रस्ते, त्यावरील उड्डाणपुल, पथदिवे अशा विविध कामांसाठी आपण केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे जिल्ह्यातील नागरिकांची गैरसोय दूर व्हावी याकरिता मागणी केली होती. केंद्रशासन आणि राज्यसरकारच्या माध्यमातून तुळजापूर तालुक्यातील विविध महामार्ग आणि महत्वाच्या रस्त्यांसह जिल्हा मुख्यालय असलेले धाराशिव शहर, बार्शी, सोलापूर-येडशी महामार्ग आदी अनेक ठिकाणी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कामांना गती देण्यासाठी प्रयत्न केले. प्रवाशांना कराव्या लागत असलेल्या गैरसोयी दूर करण्यासाठी ही सर्व कामे मंजूर करून घेतली. त्यासाठी मोठ्या प्रमाणात केंद्र आणि राज्य सरकारकडून निधीही उपलब्ध करून घेतला. त्यापैकीच 19 कोटी 82 लाख रूपये खर्चून सिंदफळ येथे लातूर पर्यायी महामार्गावर आता लातूर रोड जंक्शन उड्डाणपुल उभारला जाणार आहे. गावकऱ्यांची सोय व्हावी, त्यांच्या वाट्याला अपघाती परिस्थिती ओढवली जाऊ नये, यासाठी केलेल्या पाठपुराव्याला केंद्रातील आपल्या एनडीए सरकारने बळ दिले असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अनेक महत्वपूर्ण प्रकल्प आणि योजनांना महायुती सरकारने हिरवा कंदिल दिला आहे. त्यामुळे मोठ्या वेगात जिल्ह्याचा चेहरामोहरा सध्या बदलत आहे. अनेक महत्वपूर्ण प्रकल्प निर्णायक टप्प्यावर आहेत. जिल्ह्याच्या दळणवळणासाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या वेगवेगळ्या रस्त्यांसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून तब्बल 174 कोटींचा निधी उपलब्ध झालेला आहे. या सर्व कामांचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ऑनलाईन प्रणालीद्वारे झालेले आहे आणि त्यातील बहुतांश कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. जिल्ह्यातील कौडगाव एमआयडीसीप्रमाणेच तामलवाडी एमआयडीसी देखील लवकरच आकाराला येईल. तामलवाडी आणि कौडगाव एमआयडीसीच्या माध्यमातून येथील स्थानिक तरूणांच्या हाताला मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आहे. या दोन्ही ठिकाणी साधारणपणे 22 हजाराहून अधिक रोजगार निर्मिती होणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी नमुद केले.