धाराशिव आयटीआयला भाई उध्दवराव पाटील यांचे नाव



धाराशिव - केवळ राज्यातच नव्हे, तर देशभरात नैतिक राजकारणाचा मापदंड म्हणून आजही मोठ्या आदराने भाई उध्दवराव पाटील यांचा नामोल्लेख केला जातो. शेतकर्‍यांचे कैवारी असलेल्या झुंजारसेनानी भाई उध्दवराव पाटील यांनी केवळ शेती आणि शेतकरी एवढ्यापुरते स्वतःला सिमीत ठेवले नव्हते. जिथे अन्याय, तिथे ते पाय रोवून उभे राहत. स्वातंत्र्याचा लढा, महाराष्ट्र एकीकरण संघर्ष अशा अनेक आंदोलनातून आपल्या न्याय्य हक्कासाठी दादांनी मोठे योगदान दिलेले आहे. सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या या संस्थेला त्यांचे नाव दिल्यामुळे अनेकांना त्यातून मोठी प्रेरणा मिळणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

धाराशिव छत्रपती संभाजीनगर महामार्गावर असलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्राला झुंजारसेनानी भाई उध्दवराव पाटील यांचे नाव अधिकृतपणे जाहीर करण्यात आले. त्यांच्या नामफलकाचे अनावरण ज्येष्ठ शिक्षणतज्ञ एम. डी. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. भाई उध्दवराव दादांनी स्वयंरोजगाराची कास सर्वसामान्य कुटुंबातील मुलांनी धरायला हवी, असा विचार सातत्याने मांडला. काळाची गरज ध्यानात घेवून मोलमजुरी करणार्‍या कुटुंबासाठी आवश्यक असलेल्या बाबींचा ते आग्रह धरीत. स्वयंरोजगाराच्या अनुषंगाने महत्वपूर्ण असलेल्या या संस्थेला त्यांचे नाव दिल्यामुळे गोरगरीब कुटुंबातील मुलामुलींना मोठी ऊर्जा मिळणार आहे. दादांच्या प्रभावातूनच आपली जडणघडण झाली आहे आणि एका शासकीय संस्थेला दिलेल्या दादांच्या नामफलकाचे अनावरण आपल्या हस्ते करता आल्याचा आनंद मोठा आहे. राज्य शासनाचे त्यासाठी मनापासून धन्यवाद, अशी भावना ज्येष्ठ शिक्षणतज्ञ एम. डी. देशमुख यांनी यावेळी व्यक्त केली.

सामान्य कुटुंबातील मुले या संस्थेत शिक्षण घेत आहेत. त्यामुळे या संस्थेला दक्ष प्रकल्पाच्या अंतर्गत 25 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. एकीकडे झुंजारसेनानी भाई उध्दवराव पाटील यांचे नामकरण आणि दुसरीकडे हा भरीव निधी असा दुग्धशर्करा योग या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या वाट्याला आला आहे. राज्याच्या आणि देशाच्या सभागृहात उध्दवराव दादांनी केलेली भाषणे आजही अनेक सामाजिक समस्यांवर रामबाण उपाय ठरावित, अशीच आहेत. त्यांच्या कार्याची, व्यापक योगदानाची दखल घेवून शासकीय औद्योगिक संस्थेला त्यांचे नाव देण्याबद्दल आपण विनंती केली होती. महायुती सरकारने अत्यंत सकारात्मकपणे उध्दवराव दादांच्या एकूण योगदानाची सन्मानपूर्वक दखल घेत धाराशिव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्राला त्यांचे नाव देण्याचा निर्णय जाहीर केला. दादांच्या नावाप्रमाणे या संस्थेचा लौकिकही राष्ट्रीय पातळीवर पोहोचल्याखेरीज राहणार नाही. त्यामुळे आता दादांचे नाव आणि त्यांचा लौकिक अधिक जबाबदारीने जोपासण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. महायुती सरकारने घेतलेल्या या स्तुत्य निर्णयाबद्दल आपण त्यांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो, अशा शब्दात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी भावना व्यक्त केल्या. यावेळी नितीन काळे, देशमुख सर, मधुकर तावडे, सतीश दंडनाईक, रामदास कोळगे, राजसिंह राजेनिंबाळकर, अभय इंगळे, संदीप इंगळे, पुष्पकांत माळाळे, बिलाल रजवी, गणेश इंगळगी, विनोद निंबाळकर यांच्यासह औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

 
Top