धाराशिव (प्रतिनिधी) - विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. यामध्ये धाराशिव - कळंब विधानसभा मतदारसंघासाठी अनेकजण इच्छूक असून पक्षाकडे मागणी करीत आहेत. मात्र शिवसैनिक म्हणून राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांचे खंदे समर्थक म्हणून परिचित असलेले व मंत्री सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली थेट जनतेमध्ये जाऊन त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यास प्राधान्य देणारे शिवसेनेचे धाराशिव तालुकाप्रमुख अजित लाकाळ यांना उमेदवारी दिल्यास ते महायुतीच्या माध्यमातून निश्चितपणे विजयी होतील, अशी भावना सर्वसामान्य जनतेत निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांना धाराशिव - कळंब विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी द्यावी, अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होऊ लागली आहे.
शिवसेना धाराशिव तालुकाप्रमुख अजित लाकाळ यांचा शिवसेनेच्या कार्यकर्त्या बरोबर सातत्याने बैठका घेण्यासह ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न सोडविण्याकडे पहिल्यापासूनच कल राहीला असून त्यांनी त्यामध्ये सातत्य ठेवलेले आहे. विशेष म्हणजे शिवसेना विभाजनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाहेर पडल्यानंतर त्यांच्या सोबत उभे राहण्यासाठी जुने शिवसैनिक असलेल्या अजित लाकाळ यांनीच जिल्ह्यात पहिला प्रथम आवाज उठविला. तसेच मंत्री सावंत, माजी खासदार रवींद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यासोबत एकनिष्ठ राहून या मतदार संघांमध्ये शिवसेनेचे नेटवर्क वाढविण्याचे काम अतिशय प्रामाणिकपणे केले आहे. त्यांनी अनेक गरजू रुग्णांना मंत्री सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय योजनेच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया व औषधोपचार मिळवून दिले आहेत. तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या अडीअडचणी मंत्री सावंत यांच्यासमोर मांडून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. तसेच नुकतेच या मतदार संघातील 15 गावांचा पोक्रा योजनेमध्ये समाविष्ट करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. त्याबरोबरच घरकुल योजना, इंदिरा गांधी वृद्ध मानधन, संजय गांधी राष्ट्रीय अर्थसाह्य अनुदान व श्रावणबाळ योजना आदी योजनांचा लाभ देखील मिळवून दिला आहे. तसेच गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य उपलब्ध करून देण्याचे काम देखील केलेले आहे. त्यामुळे लाकाळ यांचा थेट जनतेशी संपर्क आला असून त्यांना या भागातील जनतेची सेवा करण्यासाठी या मतदारसंघाची उमेदवारी द्यावी, अशी मागणी जनतेतून होऊ लागली आहे. जर पक्षाने त्यांना या भागाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली तर ते आणखी जोमाने पक्षाचे कार्य वाढविण्यासह जनतेची सेवा चांगल्या पद्धतीने करतील असा सूर नागरिकांतून उमटू लागला आहे.