धाराशिव  (प्रतिनिधी)- 15 ऑक्टोबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.निवडणुक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही यासाठी निवडणुक काळात येणाऱ्या तक्रारींची निवडणुकीत काम करणाऱ्या यंत्रणांनी तात्काळ दखल घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी दिले.

15 ऑक्टोबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू होताच जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृह येथे निवडणुक यंत्रणांना भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांची माहिती आयोजित बैठकीत देतांना डॉ.ओम्बासे बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,पोलीस अधीक्षक संजय जाधव,उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिरीष यादव,उपजिल्हाधिकारी सर्वश्री संतोष भोर,उदयसिंह भोसले,संतोष राऊत,जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव,जिल्हा परिषदेचे लेखा व वित्त अधिकारी सचिन इगे,जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शेषराव चव्हाण आदीसह अधिकारी वर्ग उपस्थिती होते. तसेच चारही विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, गटविकास अधिकारी व सर्व नगरपालिका व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उपस्थिती होती.

डॉ.ओम्बासे म्हणाले,निवडणुकीसाठी लागणारी वाहने तातडीने अधिग्रहित करा.सी-व्हिजील ॲप व कक्ष तात्काळ कार्यान्वित करा.स्थिर तपासणी पथके, फिरते तपासणी पथके व व्हिडिओ पथके तात्काळ गठीत करून सक्रिय करा. पोलीस अधीक्षक जाधव यावेळी म्हणाले, निवडणूक काळात पुरेसा पोलीस बंदोबस्त राहणार आहे. विविध पथके गठीत करण्यात येणार आहेत.आंतरराज्य व जिल्ह्याच्या सीमेवर 24 तास पोलीस पथके आवश्यक त्या ठिकाणी तैनात राहणार आहेत.

 
Top