नळदुर्ग (प्रतिनिधी)- आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नामुळे नळदुर्ग येथे अप्पर तहसिल कार्यालय सुरु करण्यासाठी राज्य सरकारची मान्यता मिळाली असुन, आता लवकरच नळदुर्ग शहरात अप्पर तहसिल कार्यालय सुरु होणार आहे. अप्पर तहसिलदार कार्यालयासाठी अप्पर तहसिलदार आणि महसुल सहाय्यक या दोन पदानाही शासनाने मान्यता दिली आहे.

नळदुर्ग येथे अप्पर तहसिल कार्यालय सुरु व्हावे, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासुन अनेक संघटना, राजकीय पक्षांनी सरकार दरबारी प्रयत्न केले आहेत. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नळदुर्ग शहर व परीसरातील नागरीकांची मागणी लक्षात घेऊन नळदुर्ग येथे अप्पर तहसिल कार्यालय सुरु करण्यासाठी राज्य शासनाची मान्यता मिळावी यासाठी शासन दरबारी आपले राजकीय वजन वापरून हे काम करून घेतले आहे. दि. 9 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्र शासनाच्या महसुल व वनविभागाने नळदुर्ग येथे अप्पर तहसिल कार्यालय सुरु करण्यासाठी मान्यता दिली आहे. अप्पर तहसिलदार कार्यालय सुरु करण्याची मान्यता देण्याबरोबरच राज्य शासनाने या कार्यालयात दोन पदे नियमित वेतनश्रेणीवर मंजुर केली आहेत. यामध्ये अप्पर तहसिलदार आणि महसुल सहाय्यक या पदांचा समावेश आहे. त्यामुळे नळदुर्ग शहरात आता लवकरच अप्पर तहसिल कार्यालय सुरु होणार आहे.

तुळजापुर तालुक्याचा भौगोलिक विस्तार मोठा आहे या तालुक्यातील शेवटच्या गावाचे तालुका मुख्यालयापासुनचे सरासरी अंतर अधिक आहे. तालुक्यातील वाढत्या प्रशासकीय कामकाजामुळे सध्याच्या तुळजापुर तहसिल कार्यालयावर कामकाजाचा मोठा ताण पडत आहे. या सर्व बाबी विचारत घेऊन प्रशासकीय सोईसाठी नळदुर्ग येथे स्वतंत्र अप्पर तहसिल कार्यालय सुरु करण्यात येत आहे. नळदुर्ग अप्पर तहसिलदार कार्यालयात नळदुर्ग आणि जळकोट या मंडळातील 36 गावांचा कारभार चालणार आहे. तर तुळजापुर तहसिल कार्यालयात तुळजापुर, मंगरूळ, सावरगाव, इटकळ आणि सलगरा या मंडळातील 87 गावांचा कारभार चालणार आहे. नळदुर्ग येथे स्वतंत्र अप्पर तहसिलदार कार्यालय सुरु करण्यासाठी राज्य सरकारने मान्यता दिल्यामुळे भविष्यात नळदुर्ग हे स्वतंत्र  तालुका निर्मिती होण्याच्या दृष्टीने हे एक चांगले पाऊल पडले आहे.

आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नातुन नळदुर्ग शहर व परीसराचा विकास मोठ्याप्रमाणात होत आहे. त्यातच आता त्यांच्याच प्रयत्नामुळे राज्य शासनाने नळदुर्ग येथे अप्पर तहसिल कार्यालय सुरु करण्यासाठी मान्यता दिली आहे. याबद्दल नळदुर्ग शहर व परीसरातील नागरीकांनी महायुती सरकार तसेच आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे आभार मानले आहे.

 
Top