धाराशिव (प्रतिनिधी) - धाराशिव - कळंब विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना (ठाकरे) च्यावतीने विद्यमान आमदार कैलास पाटील यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. मात्र महायुतीकडून उमेदवारी द्यायची कोणाला ? यावरून अनेक खलबते रंगत आहेत. या उमेदवारीवरून अनेकजण उमेदवारी मिळावी यासाठी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाकडे मागणी करीत आहेत. धाराशिव मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटातर्फे केशव सावंत यांना उमेदवारी मिळणार का? या संदर्भात चर्चा सुरू आहे.
शिवसेनेच्या माध्यमातून तेरणा कारखान्याचे संचालक केशव सावंत यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये महायुतीच्या उमेदवारीवरून होणाऱ्या चर्चांना पूर्णविराम मिळणार असल्याचे दिसून येत आहे. केशव सावंत यांना शिवसेना पक्षाकडून उमेदवारी देण्यावर महायुतीच्या घटक पक्षातील सर्वच पक्षांचे एकमत झाले आहे. मात्र औपचारिक घोषणा होणे बाकी असून उद्या त्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. कारण उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा तिसरा तर उद्याचा चौथा दिवस असून उमेदवारी भरण्यासाठी व कार्यकर्त्यांना कामाला लागण्यासाठी ती यादी जाहीर होणार असल्याचे सांगितले जात आहे.