धाराशिव (प्रतिनिधी)- बारदान्याचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे सोयाबीन खरेदी संथ गतीने सुरू आहे. मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून तात्काळ बारदाना उपलब्ध करून द्यावा, यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. बारदाना खरेदीची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे लवकरच बारदाना उपलब्ध होईल आणि सोयाबीन खरेदीला वेग येईल. त्यांनतर भावातही समाधानकारक वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी बारदाना उपलब्ध होईपर्यंत सोयाबीन विक्री टाळावी असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.
तुळजापूर तालुक्यातील देवसिंगा तूळ येथे ग्रामस्थांशी संवाद साधताना आमदार पाटील बोलत होते. राज्यातील अन्नदाता शेतकरी केंद्रबिंदू मानून सरकारकडून अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. देशातील आणि राज्यातील आपल्या सरकारने सोयाबीन, कांदा आणि दूधदरवाढ यासाठी महत्वपूर्ण प्रयत्न केले आहेत. राज्य सरकारकडून शेतीसाठी मोफत वीज, एक रूपयात पीकविमा, शेतीसाठी सिंचन व्यवस्था, लाडकी बहिण योजना, अशा अनेक योजना अंमलात आणल्या आहेत. अशाच धोरणात्मक निर्णयासाठी महायुतीचे आपले सरकार पुन्हा सत्तेत असणे आवश्यक असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले. राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना सक्षम करणे ही महायुती सरकारची जबाबदारी आहे. त्यासाठी भविष्यात अनेक महत्वाचे आणि चांगले निर्णय घेतले जाणार आहेत.