धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना खरीप 2023 सालातील अनुदानाचे वितरण सोमवारपासून सुरू झाले आहे. प्रतिहेक्टर 5000 रूपयांप्रमाणे जिल्ह्यातील तीन लाख 71 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान जमा होण्यास सुरू झाले आहे. राज्यातील महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.
खरीप 2023 मध्ये सोयाबीन आणि कापसाच्या बाजारभावातील दर कमी झाल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी महायुती सरकारने सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना प्रतिहेक्टर पाच हजर रूपयांचे आर्थिक सहाय्य अनुदान म्हणून जाहीर केले होते. त्याबाबतचा शासन निर्णय देखील त्यावेळीच जारी करण्यात आला होता. ई-पीक पाहणीची अट रद्द केल्यामुळे अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ झाला. जिल्ह्यातील एकूण तीन लाख 71 हजार 202 शेतकऱ्यांना सोयाबीनच्या अनुदानापोटी सोमवारपासून प्रतिहेक्टर पाच हजार रूपयांप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत अनुदान मिळण्यास सुरूवात झाली असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. जिल्ह्यातील चार लाख 29 हजार शेतकरी इ-पीक पहाणीनुसार अनुदानास पात्र ठरले आहेत. काही शेतकऱ्यांचे ई-केवायसी होणे बाकी आहे.
पोर्टल बंद काळातील 72 तासांची मुदत गृहीत नाही
प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या हंगामात 23 ते 27 सप्टेंबर दरम्यान अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकरी काढणीपश्चात विमा कंपनीला त्याबाबत माहिती देत आहेत. 27 सप्टेंबर रोजी रात्री पोर्टल बंद असल्यामुळे अनेकांना नुकसानीची सूचना देता आली नाही. ज्या कालावधीत पोर्टल बंद होते, त्या कालावधीत नुकसानीची सूचना देण्यासाठी 72 तासांची असलेली मुदत गृहित धरली जाणार नाही. याची नोंद जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी घ्यावी.असे आवाहनही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.