धाराशिव (प्रतिनिधी)- पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या आदेशावरुन उमरगा पोलीस ठाण्याचे पथक उमरगा पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांविषयी माहिती काढून कारवाई करण्यासाठी गस्तीस होते. गस्ती दरम्यान त्यांना 6 लाख 18 हजार 385 रूपये किंमतीचा अवैध गुटखा एका दुकानात असल्याची खबर मिळाली. पथकाने छापा टाकून सदर गुटखा जप्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, उमरगा तालुक्यातील स्वामी समर्थ एंटरप्रायजेस या दुकानासमोर आले असता पथकास गोपनीय माहिती मिळाली की, इसम नामे महादेव बंडप्पा शिवनेचारी, वय 54 रा. गुंजोटी ता. उमरगा जि. धाराशिव यांनी आपल्या स्वामी समर्थ दुकानामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा साठवला आहे. यावर पथकाने महादेव शिवनेचारी यांच्या दुकानात छापा टाकला. पिशव्यांत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखू व गुटखा असा 6 हजार 18 हजार 385 किंमतीचा माल बाळगलेले आढळले. पथकाने नमूद माल जप्त करुन महादेव शिनेचारी यांचे विरुध्द उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
सदर कामगिरी ही पोलीस अधीक्षक संजय जाधव,अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी शेलार, उमरगा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक भोसले, पोउपनि पुंजरवाड, पोलीस ठाणे उमरगा येथील अंमलदार यांचे पथकाने केली.