तुळजापूर (प्रतिनिधी) - तुळजापूर तालुक्यातील मोठ्या मुल्यांकनाचे 952 विशेष दिवाणी दावे धाराशिव येथील दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर या न्यायालयात प्रलंबित आहेत. तुळजापूर तालुक्यातील पक्षकार आणि विधीज्ञांच्या सोयीकरिता तुळजापूरला वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय व्हावे या आपल्या मागणीची महायुती सरकारने योग्य ती दखल घेतली आहे.या न्यायालयासाठी आवश्यक मनुष्यबळाला मान्यता देखील दिली असल्याने आता प्रलंबित असलेल्या दिवाणाी प्रकरणांचा निपटारा कमी वेळेत होईल, असे मत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केले.
तुळजापूर येथील प्रस्तावित दिवाणी न्यायालयाला मंत्रिमंडळाची प्रशासकीय मान्यता मिळाल्याबद्दल तुळजापूर विधिज्ञ मंडळाच्यावतीने आमदार पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास तुळजापूर तालुका विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड. बालाजी देशमाने यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले की, तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र असलेल्या तुळजापूर येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय व्हावे, यासाठी आपला सातत्याने पाठपुरावा सुरू होता. तुळजापूर आणि परिसरातील अनेक नागरिक आणि विधिज्ञांची या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे मोठी सुविधा होणार आहे. शिवाय वेळ आणि पैशांची बचतही होणार आहे. पूर्वी पाच लाख मुल्यांकनापेक्षा अधिक मूल्यांचे दावे, कौटुंबिक वाद, भूसंपादनाचा वाढीव मोबदला, शासन विरोधातील विशेष दावे आदींसाठी पक्षकारांना धाराशिव येथील वरिष्ठ न्यायालयात यावे लागत होते. तसेच धाराशिव येथील न्यायालयात विविध दाव्यांचे प्रमाण अधिक असल्याने निकालासाठीही मोठी प्रतीक्षा करावी लागत होती. परंतु आता तुळजापूर येथेच वरिष्ठ दिवाणी स्तर न्यायालय मंजूर झाल्याने न्यायालयीन प्रकरणांचा निपटारा कमी वेळेत होणार आहे. वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय सुरू झाल्यानंतर तुळजापूरसह परिसरातील पक्षकार तसेच विधीज्ञांना देखील त्याचा चांगला लाभ होणार आहे. लवकरच नवीन न्यायालयीन इमारतीचे काम पूर्ण होऊन न्यायदानाचे कामही सुरू होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.