धाराशिव (प्रतिनिधी)- निम्न तेरणा उपसा सिंचन प्रकल्पाच्या दुरूस्तीला महायुती सरकारने हिरवा कंदिल दाखविला आहे. गुरूवार, 10 ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 113 कोटी रूपयांच्या दुरूस्ती प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे. माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांनी पूर्ण केलेल्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या दुरुस्तीची जबाबदारी आपण घेतली होती. दुरुस्तीसाठी लागणाऱ्या खर्चामुळे अशक्यप्राय वाटणारे हे काम आता महायुती सरकारमुळे पूर्णत्वास जाणार आहे. धाराशिव, तुळजापूर, लोहारा आणि औसा तालुक्यातील शेतकऱ्यांसह धाराशिव शहरालाही याचा लाभ होणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

जलसंपदा विभागाकडे कोणत्याही प्रकल्पाच्या दुरूस्तीसाठी एकूण बजेटच्या केवळ 10 टक्के एवढीच तरतूद असते. निम्न तेरणा उपसा सिंचन प्रकल्पाच्या दुरूस्तीसाठी 113 कोटी रूपयांची आवश्यकता होती. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या किचकट प्रश्न तयार झाला होता. राज्याच्या इतिहासात एखाद्या प्रकल्पाच्या दुरूस्तीसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी यापूर्वी उपलब्ध करून दिल्याचे उदाहरण दिसून येत नाही. स्थापत्य, विद्युत आणि यांत्रिकी हे तिन्ही स्वतंत्र विभाग आहे. या तिन्ही विभागांची कार्यालये वेगवेगळ्या शहरात आहेत. त्यामुळे या तिन्ही विभागांकडून अंदाजपत्रक तयार करून घेणे मोठे जिकिरीचे काम होते. स्थापत्य, विद्युत आणि यांत्रिकी यांच्यामध्ये सुसमन्वय घडवून प्रकल्पाच्या दुरूस्तीसाठी त्याची तांत्रिक मान्यता मिळवून घेतली. त्यासाठी मोठ्या क्लिष्ट प्रक्रियेतून जावे लागले. 113 कोटी रूपयांच्या दुरूस्ती प्रस्तावास खास बाब म्हणून मंत्रिमंडळाची मंजुरी मिळावी यासाठी केेलेल्या पाठपुराव्याला आज यश आले असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले.

 
Top