धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या कुलस्वामिनीच्या पावन भूमीतून मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या निवडणुकीचे बिगूल शिवसेना पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात फुंकले. काही नेत्यांकडून केवळ सत्ता मिळवण्यासाठी मराठा समाजाचा उपयोग केला जात आहे. युवकांनी अशा लोकांपासून सावध रहावे. आरक्षण देताना एकाला न्याय देण्यासाठी दुसऱ्या समाजावर अन्याय होवू देणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी दि. 14 सप्टेंबर रोजी धाराशिव येथे पार पडलेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात स्पष्ट केली.
शिवसेनेत नुकतेच प्रवेश केलेले भाजप नेते तथा आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांच्या पुढाकारातून शनिवारी येथे मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार चौगुले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, संपर्कप्रमुख अनिल खोचरे, नितीन लांडगे, योगेश केदार आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महायुती सरकारने मराठा समाजासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. महायुतीचे सरकार आल्यानंतर पहिल्यांदा 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. याच्या माध्यमातून पाच हजार मराठा युवकांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. विरोधकांकडून केवळ आरक्षण टिकणार नाही, अशी टिका केली जात होती. आजपर्यंत आरक्षणाला कसलाही धक्का लागला नाही. पुढेही धोका नाही. कायद्याच्या कसोटीस उतरवूनच हे आरक्षण दिले आहे. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील एक लाख मराठा युवकांना 15 लाख रूपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले आहे. आतापर्यंत कधीच दिल्या नाहीत तितक्या मराठा समाजासाठी सवलती महायुती सरकारने दिल्या. विरोधक केवळ राजकीय भांडवल करत आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात विरोधी पक्षांची भूमिका स्पष्ट नाही. केवळ मराठा समाजाचा सत्ता मिळवण्यासाठी उपयोग केला जात आहे. अशी टिकाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
यावेळी 190 शिवसेना शाखेच्या फलकांचे अनावरण व शेकडो युवकांचा शिवसेना पक्ष प्रवेश मुख्यमंत्र्यांचे उपस्थितीत झाला. मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक भास्करराव सां. नायगांवकार, बुबा साहेब उर्फ यशवंत माधवराव जाधव, शेषराज बनसोडे, गोविंद नलावडे यांचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. या मेळाव्यास जिल्हाभरातून हजारो शिवसैनिक व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थी महिला व युवानेते अभिराम पाटील, निखील कांदे पाटील तसेच जिल्हातील पदाधिकारी, तमाम शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन संदीप जगताप यांनी केले. तर आभार आदित्य सुधीर पाटील यांनी मानले.