तुळजापूर (प्रतिनिधी)-   टाटा सामाजिक विज्ञान संस्था, तुळजापूर कॅम्पसला शाश्वत शेतीतील नवकल्पनांसाठी व शेतीमित्र संस्था म्हणून महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्या वतीने देण्यात येणारा मानाचा वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषि मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते व आमदार विक्रम काळे,  कृषि सचिव जयश्री भोज, कृषि आयुक्त रविंद्र बिनवडे यांच्या उपस्थितीत देण्यात आला. दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (डोम), वरळी मुंबई या ठिकाणी प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार तुळजापूर कॅम्पसचे सामाजिक कार्यकर्ते गणेश चादरे, शंकर ठाकरे, आनंद भालेराव यांनी स्वीकारला.

याप्रसंगी,  राज्यपाल, उपमुख्यमंत्री, कृषि मंत्री यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करून पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले.  टाटा संस्था ही समाजकार्य व समाजशास्त्र या क्षेत्रातील शिक्षण देण्याबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून क्षेत्रकार्य व संशोधन कार्य प्रकल्पांच्या माध्यमातून कृषि (विशेष करून सेंद्रीय शेती), दुष्काळ निर्मुलन, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जाणीव जागृती कार्यक्रम, तसेच पंचायतीराज, उपजिविका या महत्वपुर्ण विषयाच्या माध्यमातून ग्राम व देश विकासात योगदान देण्याचे कार्य करत आहे. संस्थेने आजवर कृषि क्षेत्रामध्ये केलेल्या कार्याची दखल घेवून महाराष्ट्र शासनाने वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार देवून सन्मानीत केल्याचा आनंद होत असल्याचे कॅम्पस संचालक प्रो. रमेश जारे यांनी सांगितले.  

या प्रसंगी, संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते गणेश चादरे यांनी सांगितले की, टाटा सामाजिक विज्ञान संस्था ही समुदाय  प्रतिबद्धतेच्या (कम्यूनिटी एन्गेजमेन्टच्या), क्षेत्रकार्य कृती प्रकल्पांच्या व संशोधन प्रकल्पांच्या माध्यमातून विद्यार्थ्यामध्ये व ग्रामस्थांमध्ये लोकसहभागाच्या माध्यमातून राष्ट्रहिताच्या जबाबदारीची व सामाजिक उत्तरदायित्वाची भावना वाढीस लागावी. विद्यार्थ्यानी प्राप्त केलेले ज्ञान, कौशल्ये व त्यातुन घेतलेले अनुभव गाव विकासासाठी उपयोगात आणण्यासाठी संस्था नाविन्यपूर्ण असे कार्य करत आहे.  संस्थेने शेती, पर्यावरण व पाणलोट क्षेत्र विकासाचे राबविलेले विविध उपक्रम हे  कॅम्पसमध्ये अभ्यास भेटीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना, शाळा, कॉलेज व विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक, विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायतचे लोकप्रतिनिधी, बचत गटातील  महिला, विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांना प्रेरणादायी ठरावेत. यासाठी संस्था शेतीमित्र म्हणून योगदान देत आहे.  यासर्व कार्याचा योग्य सन्मान महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाने केल्याचा आम्हांला अभिमान असल्याचे सांगितले. 

हा पुरस्कार आम्हाला भविष्यात शेतकऱ्यांसाठी अधिक वेगाने काम करण्यास प्रेरणा देईल आणि सक्षम करेल हा विश्वास सामाजिक कार्यकर्ते शंकर ठाकरे, आनंद भालेराव यांनी व्यक्त केला.  हा पुरस्कार आम्ही सर्व शेतकरी बंधू भगिनींना विनम्रपणे समर्पित करत असल्याचे सांगितले. पुरस्काराबद्दल सर्वच स्तरातून टाटा संस्थेच्या कार्याचे कौतुक होत आहे.


 
Top