तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील मौजे उमरगा चिवरी येथील सात वर्षीय वैष्णवी गणेश सावंत ही चिमुकली अगदी शुद्ध व सुंदर असे श्री. एकनाथ लिखित भावार्थ रामायण ग्रंथाचे वाचन करते तिच्या सुंदर व मधुर गोड आवाजाने रामभक्त श्रोते मंत्रमुग्ध होतात.
उमरगा चि. येथे हनुमान मंदीरात दोन महिन्यापूर्वी तरुणांमध्ये राम नामाची गोडी निर्माण व्हावी. हा उद्देश बाळगून श्री.भावार्थ रामायण ग्रंथ वाचन निरुपणास सुरुवात करण्यात आली असून येथील रामभक्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने दररोज सायंकाळी सात वाजता हनुमान मंदीरात राम कथा श्रवण करण्यासाठी येतात. लहानासह वयोवृध्द रामभक्त वाचन व निरूपण करतात. इयत्ता पहिली मध्ये शिकत असलेली सात वर्षीय चिमुकली वैष्णवी गणेश सावंत ही अगदी शुद्ध व सुंदर असे रामायण ग्रंथाचे वाचन करते सध्याच्या सातवी आठवीच्या मुलांना मराठी ही व्यवस्थित वाचता येत नाही पण ज्या वयात बाराखडी म्हणावी त्याच वयात अगदी न चुकता अचूक असे रामायण ग्रंथाचे वाचन वैष्णवी सावंत करीत असल्याने रामभक्त ग्रामस्थांतून तिचे कौतुक केले जात आहे.