धाराशिव (प्रतिनिधी)-जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना त्वरित मोफत गणवेश देण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे सोमवारी (दि.2) निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत महिनाभरात संबंधितांना सूचना द्याव्यात, अन्यथा पहिली ते आठवी वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसह या विरोधात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा श्री. दुधगावकर यांनी दिलेल्या निवेदनात दिला आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 15 जून विद्यार्थ्यांच्या शाळेच्या सुरुवातीच्या चार दिवसात जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाया मुला मुलींना प्रत्येकी दोन गणवेश प्रमाणे एक लाख विद्यार्थ्यांना गणवेश मिळणे गरजेचे आहे. परंतु विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेबाबत विचारणा केली असता सप्टेंबर 2024 पर्यंत विद्यार्थ्यांना एकही गणवेश मिळाला नसल्याचे दिसून आले. शासनाने एक गणवेश शिवण्यासाठी जिल्ह्यास कपडा दिलेला आहे. परंतु तो शिवून घेण्यासाठी बचत गट व गारमेंट्स यांच्याकडे दिलेला आहे. जिल्ह्यात वीस ते पंचवीस हजार बचत गट असताना विद्यार्थ्यांचे ड्रेस शिवण्यासाठी दुसया जिल्ह्यातील गारमेंट्सकडे लवकर शिवून मिळतील, यासाठी दिले आहेत. परंतु तेही अजूनपर्यंत उपलब्ध झालेले नाहीत. ही पहिल्या ड्रेसची व्यथा आहे. दुसया ड्रेसचा कपडा कधी येणार कधी शिवणार आणि विद्यार्थ्यांना कधी मिळणार हे कोणी सांगत नाही. त्यासाठी जिल्हाधिकारी म्हणून आपण या विषयांमध्ये गांभीर्याने लक्ष घालून येत्या चार दिवसांमध्ये जिल्ह्यातील एक लाख विद्यार्थ्यांना ड्रेस उपलब्ध होतील, याबाबत संबंधितांना सूचना द्याव्यात, अन्यथा पहिली ते आठवी वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसह या विरोधात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दुधगावकर यांनी दिलेल्या निवेदनात दिला आहे.