धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील मागासवर्गीय भागात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत रस्ता व नालीचे काम न करता निधी हडपणाऱ्या पालिका प्रशासन व ठेकेदाराविरूध्द ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी बुधवारी रिपाइं (डे.) च्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आसूड मोर्चा काढण्यात आला.
शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्र. 211 ते कसबे घर या दरम्यान नगरपालिकेमार्फत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत रस्ता व नालीचे काम मंजूर करण्यात आले होते. परंतु नगरपालिका व ठेकेदाराने काम न करता लाखो रूपयांचा निधी हडप केला आहे. ही मागासवर्गीयांची घोर फसवणूक आहे. त्यामुळे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कागदोपत्री कामे दाखवून शासनाचा निधी हडपल्याप्रकरणी नगरपालिका प्रशासन व ठेकेदार यांच्याविरूध्द अनुसूचित जाती जमाती अत्याचा प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा नोंद करावा, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर रिपाइं (डेमोक्रेटीक) च्यावतीने बुधवारी आसूड मोर्चा काढण्यात आला.
दुपारी 12 वाजता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून आसूड मोर्चास प्रारंभ करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून हा आसूड मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. तेथे नगरपालिकेची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात काढून अंत्यसंस्कार करण्यात आले. या आंदोलनात रिपाइं (डे.) जिल्हाध्यक्ष सत्यम गायकवाड, जिल्हा संपर्कप्रमुख राज धज, जिल्हाध्यक्ष कृष्णा भोसले, शहर उपाध्यक्ष सुमित साबळे, कौतूक माने, वैभव राठोड, महेश ओव्हाळ, अजय माने, शाहीर पोपट खिल्लारे, पोतराज सतीश शिंदे, अनिल पारडे, राजाभाऊ कोळी, शाहू खिल्लारे सहभागी होते. यावेळी नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात आंदोलकांनी घोषणा दिल्या. आंदोलकांनी या आंदोलनानंतर येत्या 10 दिवसात संबंधितांविरूध्द गुन्हा नोंद न झाल्यास आमरण उपोषण व तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.