धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर विकासनगर आणि जुना उपळा रोडलगत अंडरपास, सर्व्हिस रोडचे व पथदिवे काम तात्काळ सुरु करावे यासह इतर नागरी समस्यांबाबत या भागातील नागरिकांसह दररोज गैरसोयीला सामोरे जावे लागणाऱ्या पालकांच्या वतीने बुधवारी (दि.25) जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. तसेच येथे सध्या सुरु असलेल्या लोखंडी दादऱ्याचे काम तात्काळ थांबवून अंडरपास, पथदिवे आणि सर्व्हिस रोडचे काम तात्काळ सुरु करावे. मागणीची आठ दिवसांत दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, धुळे-सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग धाराशिव शहरातून जातो. या महामार्गालगत डी मार्ट, पोदार इंटरनॅशनल स्कुल व मंगल कार्यालये मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच इथे नागरी वस्ती मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे महामार्गालगत विकासनगर येथे अंडरपास करण्यात यावा, तसेच इथे पथदिवे बसवावे, सध्या इथे लोखंडी दादऱ्याचे काम सुरु आहे ते तात्काळ थांबवुन आधी सर्व्हिस रोड, अंडरपास आणि पथदिवे बसवावेत त्यानंतर लोखंडी दादऱ्याचे काम करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या महामार्गालगत सर्व्हिस रोड करणे अत्यंत आवश्यक आहे. शाळेच्या स्कुल बस व पालक मोटारसायकलवरुन शाळेत सोडण्यासाठी पाल्यांना घेऊन जात असल्यामुळे वर्दळ वाढलेली आहे, परंतु सर्व्हिस रोड नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. परंतु कंपनीला याचे काहीही देणे-घेणे नाही. जुना उपळा रोडला देखील अंडरपास ची आवश्यक आहे. सदर निजामकालीन रस्त्यावरुन जवळपास 8 ते 10 गावचे नागरिक धाराशिव येथे येतात. या लोकांची मोठया प्रमाणात गैरसोय होत आहे. येेथे अंडरपास या कामांचा प्रस्ताव तात्काळ रस्ते वाहतुक मंत्रालयाकडे पाठवुन जनतेची होणारी गैरसोय दूर करावी व अपघाताचे प्रमाण कमी करावे. अशी मागणी उपळा (मा) गावासह धाराशिव शहरातील नागरिक सातत्याने करत आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी लोखंडी दादऱ्याचे नागरिकांनी बंद पाडलेले काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे. तेरणा उड्डाणपूल ते वरूडा रोड उड्डाणपूल हे अपघातप्रवण क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आलेले आहे. एक-दोन दिवसाआड नेहमीच अपघात होत असतात. आजवर शेकडो जणांना जीव गमवावा लागला. तेवढेच लोक जायबंदी झाले आहेत. वाढते अपघात लक्षात घेता, लोखंडी पुलाचे काम थांबवून विकासनगर, जुना उपळा रोडसाठी अंडरपास, पथदिवे बसवण्यात यावे तसेच सर्विस रोड तयार करण्यात यावा, अशी मागणी स्थानिक रहिवाशांसह उपळा (मा) व इतर दहा ते बारा गावातील ग्रामस्थांची मागणी आहे. या मागणीचा आठ-दहा दिवसांत निर्णय न झाल्यास शिवसेना शहरप्रमुख आणि या भागातील स्थानिक रहिवाशी यांच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे.