धाराशिव (प्रतिनिधी)- महिलांनी सक्षम होणे ही एक काळाची गरज आहे. खऱ्या अर्थाने आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक सक्षम होण्यासाठी बचत गट हा एक महत्त्वपूर्ण मार्ग आहे. असे प्रतिपादन माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी उमरगा येथे आयोजित कार्यक्रमात केले.
बहुजन रयत परिषदेच्या वतीने पुरस्कार वितरण समारंभ व बचत गटाविषयीचे मार्गदर्शन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विविध क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या व्यक्तींना बहुजन रयत परिषदेच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे पुढे म्हणाले की, आज व्यसनाधीनता प्रचंड प्रमाणामध्ये वाढत आहे. या व्यसनाधीनतेला लगाम घालण्यासाठी महिलांनी पुढे येणे गरजेचे आहे. तरच घराची अर्थव्यवस्था व्यवस्थितपणे सुरू राहील. ॲड कोमल साळुंखे ढोबळे यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बचत गटाच्या माध्यमातून दहा हजारापेक्षा जास्त महिलांना सक्षम करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. धाराशिव जिल्ह्यातील महिला भगिनींनी देखील ॲड. कोमल साळुंखे -ढोबळे यांच्याकडे अर्ज भरून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असेही ते यावेळी म्हणाले. पुरस्कार प्राप्त व्यक्तींचे त्यांनी अभिनंदन केले.
सदर कार्यक्रमासाठी उमरगा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले हे उपस्थित होते. आपले मनोगत व्यक्त करताना आमदार चौगुले म्हणाले की, ॲड. कोमल साळुंखे-ढोबळे यांचे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे. ज्या ज्या व्यक्तींना पुरस्कार मिळालेला आहे त्यांचे आमदार चौगुले यांनी अभिनंदन केले.
बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष ॲड. कोमल साळुंखे -ढोबळे यांनी मनोगत व्यक्त करताना, धाराशिव जिल्ह्याशी आपले जिव्हाळ्याचे नाते आहे. या जिल्ह्याशी माझा खूप दिवसापासूनचा ऋणानुबंध आहे. धाराशिव जिल्ह्याला खूप मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील गरजू महिला भगिनींनी एकत्रित येऊन बचत गटाच्या माध्यमातून आपली आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक उन्नती साध्य करणे महत्त्वाचे आहे. यासाठी मी आपल्या समवेत सदैव आहे असे देखील त्या यावेळी म्हणाल्या.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक बहुजन रयत परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष बालाजी गायकवाड आणि प्रदेश सरचिटणीस ईश्वर क्षीरसागर यांनी केले. आभार ईश्वर क्षीरसागर यांनी मानले. सदर कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील प्रतिष्ठित व्यक्ती, उद्योजक व मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.