धाराशिव (प्रतिनिधी)- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने राज्यात विविध महाविद्यालयातून प्रत्येकी एक आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून एक केंद्र धाराशिव जिल्ह्यातील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय या ठिकाणी असलेल्या सर्व सुविधांचा विचार करून तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त आणि विद्यमान आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या मार्गदर्शना खाली स्थापन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन देशाचे प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे (ऑनलाईन) महाविद्यालयाच्या मुख्य सभागृहामध्ये करण्यात आले. या कौशल्य विकास केंद्रामार्फत विद्यार्थ्यांमध्ये रोजगाराभिमुख कौशल्य विकसित करण्यासाठी महाविद्यालयामध्ये आर्टिफिशियल  इंटेलिजन्स व किसान  ड्रोन ऑपरेटर हे दोन कोर्सेस राबविण्यात येणार आहेत.

विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविण्यासाठी हे दोन्ही कोर्सेस अत्यंत महत्त्वाचे आहेत तसेच हे दोन्ही कोर्स विद्यार्थ्यांसाठी निशुल्क असतील त्यामुळे विद्यार्थी आपला व्यवसाय सुरू करू शकतील त्याच बरोबर नामांकित कंपनीमध्ये सर्वोच्च पॅकेज ही प्राप्त करू शकतील. सदर उद्घाटन समारंभ दूरदृष्टी प्रणाली द्वारे राज्याचे राज्यपाल डॉ. सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. याचबरोबर प्रत्यक्ष महाविद्यालयात या प्रसंगी कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विक्रमसिंह माने, विभाग प्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top