धाराशिव (प्रतिनिधी)- परतीच्या पावसात शिराढोण परिसरात ढगफुटी सदृष्य पाऊस झाल्याने शिराढोण उपकेंद्र, रायगव्हाण, आवड शिरपुरा उपकेंद्रांचा वीजपुरवठा खंडीत झाला होता. शिराढोण शाखा कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी याची त्वरीत दखल घेत वीजपुरवठा पुर्ववत करण्यासाठी बॅटरी व मोबाईलच्या प्रकाशात मानवी साखळी तयार करून नदी पार करत वीजपुरवठा पुर्ववत करण्यात यश मिळवले. अडचणीवर मात करत अवघ्या काही तासात वीजपुरवठा सुरळीत केल्याबद्दल महावितरणच्या जनमित्रांचे सर्वत्र कौतूक होत आहे.
धाराशिव परिसरात काल रात्री झालेल्या अतिवृष्टीने महावितरणच्या शिराढोण शाखा कार्यालया अंतर्गत येणाऱ्या शिराढोण, रायगव्हाण, आवड शिरपुरा या उपकेंद्रांच्या वीजवाहिन्यांवरील वीजपुरवठा खंडीत झाला होता. केवळ पाऊसच नव्हे तर विजांचा कडकडाटही सुरू असल्याने कुठे फॉल्ट झाला आहे. हे शोधणेही तारेवरची कसरत करण्यासारखे झाले होते. अशा अवस्थेतही वरिष्ठ कार्यालयाच्या निर्देशानुसार उसंत न घेता मोबाईलच्या प्रकाशात शिराढोणच्या जनमित्रांनी नदीला पाणी जास्त असल्याने पाण्यात उतरून मानवी साखळीच्या सहाय्याने फॉल्ट झालेल्या लघूदाब वीजवाहिनीच्या खांबावर चढूण मोबाईल व बॅटरीच्या उजेडात वीजपुरवठा पुर्ववत करण्यात यश मिळवले. रात्रभर वीजपुरवठा बंद राहील की काय अशी परिस्थिती असताना अवघ्या तीन-चार तासात तीनही उपकेंद्रांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश प्राप्त झाले. या कामगिरीमुळे जनमित्रांचे कौतूक होत आहे.