नळदुर्ग (प्रतिनिधी)- तुळजापुर विधानसभा मतदार संघात विधानसभा निवडणुक लढविण्यासाठी यावेळी अनेकजण इच्छुक असल्याने या मतदार संघात बहुरंगी लढत होण्याची शक्यता आहे. राज्याचे माजी मंत्री व काँग्रेसचे जेष्ठ नेते मधुकरराव चव्हाण हे पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात पुर्ण ताकदीने उतरल्यामुळे महाविकास आघाडीकडुन निवडणुक लढविण्यासाठी ज्यांनी प्रयत्न सुरु केले होते त्यांच्यामध्ये निराशा पसरली आहे.
तुळजापुर विधानसभा निवडणुक यावेळी देखील 2019 च्या निवडणुकीप्रमाणे चुरशीची होणार असल्याचे दिसुन येत आहे. या मतदार संघाचा इतिहास पहिला तर 2019 ची विधानसभा निवडणुक वगळता प्रत्येक निवडणुकीत या मतदार संघातुन “धोतरवला“ उमेदवारच निवडुन आला आहे. 2019 पर्यंत या मतदार संघात कै. साहेबराव पाटील हंगरगेकर, शिवाजीराव पाटील बभाळगावकर, माणिकराव खपले, सिद्रामप्पा आलुरे गुरुजी, आणि मधुकरराव चव्हाण हे निवडुन आले आहेत. विशेष म्हणजे हे सर्वजण धोतर परीधान करणारेच होते. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीत या मतदार संघाचे भाजपचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी मधुकरराव चव्हाण यांचा पराभव करून या मतदार संघात धोतरवाला निवडुन येण्याची परंपरा खंडीत केली. या मतदार संघात सलग चार वेळा आणि एकुण पाचवेळा निवडुन येण्याची किमया काँग्रेसचे जेष्ठ नेते मधुकरराव चव्हाण यांनी केली आहे, शिवाजीराव पाटील बाभाळगावकर दोन वेळेस तर माणिकराव खपले तीनवेळेस या मतदार संघातुन निवडुन आले आहेत. हा मतदार संघ काँग्रेसचा गड म्हणुन ओळखला जात होता. मात्र 2019 साली आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी काँग्रेसचा हा गड उध्वस्त करीत पहिल्यांदा या मतदारा संघात भाजपचा झेंडा फडकविला आहे.
गेल्या पाच वर्षात आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी तुळजापुर विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत आजही या मतदार संघात त्यांच्या प्रयत्नातुन कोट्यावधी रुपये खर्चाची महत्वपुर्ण विकासकामे सुरु आहेत. गेल्या अनेक वर्षांपासुन नळदुर्ग शहरात पाण्याचा प्रश्न अतिशय बिकट होता. बोरी धरण पाण्याने तुडुंब भरलेले असतानाही नळदुर्गकरांना आठ ते दहा दिवसाआड पाणी मिळत होते. अनेकांनी पाण्याचा हा प्रश्न सोडविण्याच्या फक्त वलगनाच केल्या मात्र एकाही नेत्यांना नळदुर्गकरांचा हा महत्वाचा प्रश्न सोडविला नाही मात्र आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी हा प्रश्न सोडविला असुन सध्या 46 कोटी रुपये खर्चाच्या नळदुर्ग पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु आहे. हे काम पुर्ण झाल्यानंतर आता नळदुर्ग करांना दररोज पाणी मिळणार आहे. त्याचबरोबर नळदुर्ग शहरात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नामुळे अप्पर तहसिल कार्यालय मंजुर झाले आहे. या सर्व कामांचा फायदा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना नक्की होणार यात शंका नाही. फक्त भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम करून या कामांची माहिती नागरीकांपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे.
या मतदार संघात आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार मधुकरराव चव्हाण, देवानंद रोचाकरी, अशोक जगदाळे, आण्णासाहेब दराडे, डॉ. स्नेहा सोनकाटे, ऍड. धीरज पाटील यांच्यासह कांहीजण इच्छुक आहेत. यातील कांही मंडळींना विधानसभा निवडणुक आली की मगच तालुक्यातील जनतेची आठवण येते. इतरवेळी मात्र ही मंडळी कुठल्या बिळात जाऊन बसतात हे समजत नाही. आज अनेकजण या निवडणुकीची जय्यत तयारी करत आहेत. अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातुन, मतदारांच्या गाठीभेटी घेऊन आपण विधानसभा निवडणुक लढविणार असल्याचे सांगत आहेत.
सध्या या मतदार संघात महाविकास आघाडीचे नेते अशोक जगदाळे, माजी आमदार मधुकरराव चव्हाण, देवानंद रोचकरी, आण्णासाहेब दराडे, ऍड. धीरज पाटील, डॉ. स्नेहा सोनकाटे या गावागावात बैठका घेऊन मतदारांशी विविध प्रश्नांवर चर्चा करून आपली बाजु मतदारांसमोर मांडत आहेत. यामध्ये आण्णासाहेब दराडे यांनी तर कमालच केली आहे. ना राजकीय गॉडफादर, ना राजकीय कुठली पार्श्वभुमी नसताना त्यांनी प्रचारात जी आघाडी घेतली आहे आणि त्यांना जो मतदारांचा प्रतिसाद मिळत आहे याबद्दल त्यांचे कौतुक करावे लागेल.
या मतदार संघात यावेळी बहुरंगी लढत होण्याची शक्यता आहे.कारण कुणीच माघार घ्यायला आज तयार नाही. काँग्रेसचे जेष्ठ नेते मधुकरराव चव्हाण यांनी पुन्हा एकदा मीच विधानसभा निवडणुक लढविणार असल्याचे जाहीर केल्याने महाविकास आघाडीकडुन निवडणुक लढविण्याची जय्यत तयारी करीत असलेले महाविकास आघाडीचे नेते अशोक जगदाळे आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. धीरज पाटील यांची मात्र यामुळे मोठी गोची झाली आहे. हा मतदार संघ महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडे आहे हे विसरून चालणार नाही. त्यामुळे येणाऱ्या कांही दिवसात या मतदार संघात अनेक राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.