धाराशिव (प्रतिनिधी)- मुलींनी पोलीस दलामध्ये करिअर करावे असे प्रतिपादन पोलीस उपनिरीक्षक अनघा गोडगे यांनी केले. रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात संस्थामाता श्रीमती सुशीलादेवी साळुंखे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होत्या.

संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांची जयंती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सक्षमीकरण विभाग आणि अंतर्गत तक्रार निवारण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गोडगे पुढे म्हणाल्या की, विद्यार्थिनींनी पोलीस दलामध्ये करिअर करावे आणि आपण नेहमीच स्वसंरक्षणासाठी सज्ज रहावे. पोलीस दलात विविध  विषयावर आपल्याला काम करता येते, समाजातील समस्या सोडवता येतात यासाठी मुलींनी पुढे येऊन पोलीस दलात करिअर करावे. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.सावता फुलसागर हे होते. सर्वप्रथम शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे आणि संस्थामाता  सुशीलादेवी साळुंखे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून श्रीमती सुशीलादेवी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.स्वाती बैनवाड यांनी केले, सूत्रसंचालन प्रा.सुप्रिया शेटे यांनी केले तर आभार महिला सक्षमीकरण विभागाच्या समन्वयक डॉ. स्वाती जाधव यांनी मांनले.  सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व महिला प्राध्यापक आणि मोठ्या प्रमाणावर विद्यार्थिनी उपस्थित होत्या. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

 
Top