धाराशिव (प्रतिनिधी)-सामाजिक अन्याय दूर करण्यासाठी संविधानाचे मार्गदर्शन आवश्यक असून ज्यांनी धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद संविधानात समावेश केला तेच लोक आज संविधान बदलण्याचा आरोप करत आहेत ,उद्योजकता जातीवर आधारित नाही ,संविधानांन सर्वांना समान अधिकार दिले असून आरक्षणाचा अर्थ समजावून घेतला पाहिजे , आरक्षणामुळे सगळ्यांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत, या संविधानाने प्रत्येकाला उद्योग उभारण्याचं स्वातंत्र्य दिलं असून पूर्वीचे जाती व्यवस्था वर आधारित व्यवसाय संविधानाने मोडून काढले आहेत. या संविधानाने नालंदा विद्यापीठ पुन्हा सुरू केले. काळ बदलत चालला आहे संविधान सामाजिक न्यायाचा पुरस्कार करतो ज्यांना शिकायचा अधिकार नव्हता त्यांना आवडीचे शिक्षण घेण्याचा पर्याय या संविधानाने दिला सामाजिक न्याय - संविधानाच्या प्रकाशात बघण्याची गरज आहे असं प्रतिपादन आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते आणि जलभूमी व्यवस्थापन संस्था छत्रपती संभाजी नगरचे माजी प्रमुख डॉक्टर रमेश पांडव यांनी केले.
ते काल धाराशिव इथं अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय संविधान आणि सामाजिक न्याय या विषयावर व्याख्यानात बोलत होते.यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य ऍडव्होकेट मिलिंद पाटील जिल्हा विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष एडवोकेट प्रसाद जोशी श्री नितीन दादा भोसले एडवोकेट अविनाश मैंदरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना पांडव पुढे म्हणाले की राज्यघटनेमध्ये कलम 13 ते 35 ही कलमे सामाजिक न्यायासाठी आहेत त्यामधून सर्वांना सामाजिक न्याय तसेच प्रत्येकाला तू कोण आहेस तुझा जन्म कुठे झाला कोणत्या जातीत झाला कोणत्या लिंगात झाला असे न समजता सर्वांना समान मानले गेले आहे. संधीची समानता या संविधानाने आपल्याला दिले आहे संविधान भारतीय तत्त्वज्ञानातून तयार झाले आहे.
एडवोकेट मिलिंद पाटील यांनी यावेळी संविधानाच्या विविध कलमांचा उल्लेख करून नुकतेच नव्या स्वरूपात आलेल्या कायद्यांची माहिती दिली.तर एडवोकेट प्रसाद जोशी यांनी अनेक कायद्यामधील उल्लेखनीय दाव्यांचा संदर्भ देऊन संविधानाचे महत्त्व विशद केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एडवोकेट प्रवीण क्षीरसागर यांनी केले त्यात त्यांनी अधिवक्ता परिषदेच्या वाटचालीचा आढावा घेतला तसेच अधिवक्ता परिषदेकडून ज्यांच्याकडे वकील द्यायला पैसे नाहीत अशांसाठी मोफत वकील उपलब्ध करून देण्यासह अनेक सामाजिक कामे सुरू असल्याचे सांगितले.त्यामुळे विधीज्ञांनी अधिवक्ता परिषदेसाठी काम करावे असे आवाहन केले.
या व्याख्यानासाठी शहर आणि जिल्ह्यातील अनेक विधीज्ञ संविधान आणि कायद्याचे अभ्यासक तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी भारतमाता श्री छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून दीपक प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सूत्रसंचालन एडवोकेट माढेकर यांनी केले.