धाराशिव (प्रतिनिधी)- मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यांत कोसळला होता.  या घटनेच्या निषेधार्थ शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या सदस्यांनी सुरू केलेले आत्मक्लेश उपोषण आंदोलनाच्या सहाव्या दिवशी (दि.9) शिवप्रेमींनी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तब्बल एक तास रास्ता रोको आंदोलन केले. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन आंदोलकांच्या मागणीबाबत कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण आंदोलन मागे घेण्यात आले. 

मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची देखभाल आणि मुळातच पुतळा निकृष्ट दर्जाचा उभारण्यात आलेला असल्याने तो वाऱ्याने कोसळून पडला. या घटनेमुळे तमाम शिवप्रेमीमधून तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर धाराशिव येथे शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या सदस्यांनी आत्मक्लेश उपोषण आंदोलन सुरू केले होते. दरम्यान पाचव्या दिवशी संभाजी राजे छत्रपती यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली होती. सोमवारी आक्रमक झालेल्या शिवप्रेमींनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करून पुतळा कोसळल्याच्या प्रकरणात तत्काळ कारवाईची मागणी केली. त्यानंतर धाराशिवचे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी आंदोलक आणि उपोषणकर्त्यांची भेट घेऊन निवेदनाच्या अनुषंगाने कारवाई करण्याचे आश्वासन देऊन उपोषण मागे घेण्याबाबत चर्चा केली. त्यानंतर शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे आत्मक्लेश उपोषण आंदोलन सहाव्या दिवशी मागे घेण्यात आले. 

यावेळी उपोषणकर्ते धर्मराज सुर्यवंशी, अमोल सिरसट, दत्ता जावळे, सतीश थोरात, योगेश अतकरे तसेच शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे पदाधिकारी व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top