नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यातील प्रेक्षनीय व नयनरम्य नर -मादी धबधबा दि. 26 सप्टेंबर रोजी प्रवाहीत झाला आहे. आता किल्ल्यात पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी कमी पाऊस झाल्यामुळे नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यातील नर-मादी तसेच शिलक हे दोन्ही धबधबे सुरु झाले नव्हते. त्यामुळे किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची त्यावेळी निराशा झाली होती. मात्र यावर्षी बोरी धरण पाणलोट क्षेत्रात परतीचा पाऊस चांगला झाल्याने नळदुर्ग येथील बोरी धरण दि. 25 सप्टेंबर रोजी पुर्ण क्षमतेने भरून धरणाचा सांडवा सुरु झाला होता. या सांडव्याचे पाणी पुढे बोरी नदीत जाते आणि या नदीवरील किल्ल्यातील शिलक आणि नर -मादी हे दोन्ही धबधबे सुरु होतात. यामुळेच दि. 26 सप्टेंबर रोजी दुपारी नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यातील पर्यटकांचे विशेष आकर्षण असलेले शिलक आणि नर -मादी हे दोन्ही धबधबे सुरु झाले आहेत.
नळदुर्गच्या किल्ल्यातील नर -मादी आणि शिलक हे धबधबे पुर्वीपासुन प्रसिद्ध आहेत. हे धबधबे सुरु झाल्यानंतर किल्ल्यात लाखो पर्यटक हजेरी लावतात.
उत्तरेच्या बाजुने बोरी नदी किल्ल्यात वाहत येऊन, तीला चंद्रकोरीचा आकार देऊन पुन्हा उत्तरेकडे वळविण्यात आली आहे. बोरी नदीच्या शेवटच्या टोकाला पुर्व -पश्चिम असा बंधारा अतिशय कल्पकतेने व भक्कमपणे बांधला आहे. बंधाऱ्याच्या वरच्या बाजुला नदीच्या पुराचे पाणी वाहुन जावे म्हणुन दोन भले मोठे सांडवे तयार करण्यात आले आहेत. या दोन सांडव्यांनाच नर व मादी अशी नावे देण्यात आली आहेत. यालाच नर -मादी धबधबा असे म्हणतात. नर-मादी धबधबा सुरु झाल्यानंतर धबधब्यातील पाणी 100 फुट खाली फेसाळत जाऊन आदळते. हा डोळ्याचे पारणे फेडणारा क्षण पाहण्यासाठी पर्यटक हा धबधबा सुरु होण्याची आतुरतेने वाट पाहतात. किल्ल्यातील प्रेक्षनीय व नेत्रदीपक नर -मादी धबधबा सुरु झाल्याने यावर्षी पर्यटकांना नर-मादी धबधबा वाहताना पाहता येणार आहे. त्यामुळे येणाऱ्या दोन दिवसात किल्ल्यात पर्यटकांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.