धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अनेकांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला आहे. सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल विभागाला द्यावे. अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राज्यासह धाराशिव जिल्हयामध्ये मागील दोन दिवसात अतिवृष्टी व सततचा पाऊस चालु असल्यामुळे पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान होऊन काही ठिकाणी जनावरेही मृत पावलेली आहेत. जिल्हयातील 16 महसुल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे. इतर महसुल मंडळामध्येही सततच्या पावसाने काढणीला आलेल्या मुग, उडीद, पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले असुन पिक पाण्याखाली गेल्यामुळे जागेवरच त्याला मोड येत आहे. मुख्य पिक असलेले सोयाबीन शेंगा भरण्याच्या अवस्थेत असुन सोयाबीन पिकात पाणी साचल्यामुळे ते पिवळे पडत आहे. त्याचबरोबर कापुस, कांदा पिकाचे व कांदा लावणीसाठी तयार करण्यात आलेल्या कांदा रोपाचेही मोठया प्रमाणात नुकसान झाले असल्याने हाता तोंडाशी आलेला घास पावसाने हिराऊन घेतल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना भरीव अशी आर्थिक मदत करणे आवश्यक आहे. तरी धाराशिव जिल्हयात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत करणेबाबत योग्य ते सहकार्य करावे अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे.