नळदुर्ग  (प्रतिनिधी)- गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या“ चा प्रचंड जयघोष, ढोल-ताशांचा दणदणाट, लेझीमचा खेळ व हजारो गणेश भक्तांच्या उपस्थितीत 17 सप्टेंबर रोजी नळदुर्ग शहरात गणेश विसर्जन मिरवणुक शांततेत उत्साहात पार पडली.  यावेळी मराठा गल्ली येथील गणेश विसर्जन घाटावर श्री गणपतीचे मोठ्या भक्तिभावाने विसर्जन करण्यात आले.विसर्जन मिरवणुक पाहण्यासाठी हजारो गणेशभक्त मिरवणुकीत सहभागी झाले होते. 

सालाबादप्रमाणे याहीवर्षी नळदुर्ग शहरात गणेश विसर्जन मिरवणुक मोठ्या थाटामाटात व उत्साहपुर्ण वातावरणात शांततेत पार पडली. या मिरवणुकीत शिवशाही तरुण गणेश मंडळ, नव चैतन्य तरुण गणेश मंडळ, न्यू. चैतन्य तरुण गणेश मंडळ,, जय हिंद तरुण गणेश मंडळ व्यासनगर, जवाहर गणेश मंडळ बेडगे गल्ली, शिवनेरी तरुण गणेश मंडळ, इंदिरानगर गणेश मंडळ हे प्रमुख गणेश मंडळ सहभागी झाले होते. विसर्जन मिरवणुक रात्री बारा पर्यंत चालली. यावेळी मिरवणुकीत ढोल–ताशांचा दणदणाट, डॉल्बीचा आवाज घुमत होता. शिवशाही तरुण गणेश मंडळाच्या लेझीम पथकाने अतीशय सुंदर व नेत्रदीपक खेळ करून सर्वांचे लक्ष वेधुन घेतले होते. त्याचबरोबर नव चैतन्य तरुण गणेश मंडळ, जवाहर तरुण गणेश मंडळ, जय–हिंद तरुण गणेश मंडळ व्यासनगर, यांच्यासह सर्वच गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत खेळांचे पथक होते. सर्वांनीच अतीशय उत्कृष्ट खेळ करून गणेश भक्तांची वाहवा मिळविले. अनेक गणेश मंडळाचे युवा कार्यकर्ते डॉल्बीच्या तालावर नृत्य करीत होते. विसर्जन मिरवणुक उत्साहात, भक्तीमय वातावरणात व शांततेत पार पडली. यावेळी सर्व पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते. यावेळी नळदुर्ग शहरातील मुस्लिम बांधवांनी एकात्मतेचा संदेश देत ऐतिहासिक चावडी चौकात विसर्जन मिरवणुकीचे स्वागत करून सर्व गणेश मंडळांच्या अध्यक्षांचा सत्कार केला .विसर्जन मिरवणुक शांततेत पार पडावी यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्ग पोलिस ठाण्याचे  पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांनी कडक पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

 
Top