धाराशिव (प्रतिनिधी)-लाखों बहिणींनी मला लाडका भाऊ केला. मुख्यमंत्री पदापेक्षा लाडका भाऊ म्हणून लाखो बहीणींचे प्रेम मिळाल्याने जास्त आनंद होत आहे. महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबविण्याच्या जो निर्णय घेतला तो सार्थकी ठरला. आज  या बहिणींचा आनंद व उत्सव पाहून मला प्रेरणा मिळाली. हेच माझे टॉनिक आहे. विरोधक मात्र हे लाडकी बहीण चुनावी जुमला आहे. निवडणुकीनंतर ही योजना बंद होणार आहे. काही जण कोर्टात गेले. या योजनेत विरोधकांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला. त्यांना जोडा दाखवा असे म्हणूत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांच्या पाया खालीची वाळू सरकली आहे. बहीण लाडकी आणि विरोधकांच्या धातीत धडकी असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणात लगावला. 

परंडा येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम शनिवार दि. 14 सप्टेंबर रोजी घेण्यात आला. या कार्यक्रमास महिलांची संख्या लक्षणिय होती. पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पैशाच्या राशीत लोळणाऱ्यांना दीड हजाराची किंमत काय करणार आहे. मी शेतकरी कुटुंबातून आलो आहे. त्यामुळे मला दीड हजाराचे महत्व अधिक आहे. लाडक्या बहिणींच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. आमचे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे. समृध्दी महामार्ग त्याप्रमाणे राज्यात अनेक ठिकाणी विकासाचे अनेक प्रकल्प सुरू केले आहेत. परकीय गुंतवणूकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. हे सांगून मुख्यमंत्री शिंदे यांनी लाडक्या भावाबरोबरच वयोश्री योजना, तीर्थदर्शन योजना व इतर योजना संदर्भात माहिती दिली. कांदा निर्यातीसंदर्भात बोलताना निर्यात शुल्क रद्द करण्याच्या निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्याप्रमाणे सोयाबीन वरील आयात शुल्क वाढविले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी काम करणारे हे सरकार आल्याचे सांगत सीएम म्हणजे चिफ मिनिस्टर नाही तर सीएम म्हणजे कॉमन मॅन आहे असे शिंदे यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी परंडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पुतळा उभा करावा अशी सुचना केली. पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी गुढी पाडव्यापर्यंत सिना कोळगाव प्रकल्पात उजनीचे 7 टीएमसी पाणी यावे या संदर्भात बैठक लावण्याची मागणी केली होती. याविषयी मुख्यमंत्री शिंदे यांनी येत्या 15 दिवसात या संदर्भात बैठक लागून 7 टीएमसी पाणी देण्याच्या कामाला गती देवू असे सांगितले. 

कार्यक्रमाचे प्रस्ताविक पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केले. यावेळी मंत्री तानाजी सावंत यांनी आरोग्य विभागाचा लेखाजोखा मांडला. आरोग्य विभागाचे मंत्रीपद मिळाल्यानंतर आपण नाराज होतो. परंतु मुख्यमंत्री शिंदे यांनी तुमच्या हस्ते जनसेवा होणार आहे म्हणून हे खाते तुम्हाला दिले आहे असे सांगितले. त्यामुळेच गेल्या दोन वर्षात केलेल्या कामामुळे व पंढरपुर येथील आरोग्य शिबिरामुळे जागतिक स्तरावर याची नोंद घेतली असल्याचे सावंत यांनी सांगितले. यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, जि. प. चे सीईओ मैनक घोष, पोलिस अधीक्षक संजय जाधव, जि. प. चे माजी सभापती दत्ता साळुंके, शिवाजी सावंत, माजी नगराध्यक्ष सुभाषसिंह सिध्दीवाल, जाकीर सौदागर, संजय बनसोडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव व ऐश्वर्या हिंबारे  तर आभार प्रदर्शन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी मानले. 

 
Top