धाराशिव (प्रतिनिधी)- तुळजापूर तीर्थक्षेत्राच्या वैभवात भर टाकणारा व भाविक भक्त, पुजारी व शहरवासीयांना विश्वासात घेत सोयी-सुविधा उपलब्ध करुन देणारा परिपुर्ण असा रु. 1999 कोटींचा विकास आराखडा अंतिम करण्यात आला आहे. पालकमंत्री व मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील उचाधिकार समितीच्या मान्यतेसह या प्रस्तावास पुढील दहा दिवसात मंजुरी मिळेल असा विश्वास आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी सर्किट हाऊस तुळजापूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केला.
आई तुळजाभवानीचे तिर्थक्षेत्र विकसीत करण्यासाठी प्राथमिक विकास आराखडा तयार करण्यात आला होता. या विकास आराखडयास 16 सप्टेंबर 2023 रोजी छत्रपती संभाजी नगर येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तत्वत: मान्यता देण्यात आली होती.
तदनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून आयडिया कॉम्पटिशन घेण्यात आली होती. निश्चित केलेल्या वास्तुविशारद कंपनीने आराखड्याचे सादरीकरण केल्यानंतर सदरील आराखडया मंदिर संस्थानच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करून नागरिकांच्या सुचना व हरकती मागवून घेण्यात आल्या.
दि.20 जुलै रोजी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी शहरवासीयांसोबत बैठक घेतली. आलेल्या सुचनांवर निर्णय घेण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी यांची समिती स्थापन करण्यात आली. पुजारी, भाविक व शहरवासियांच्या सुचनांचा अभ्यास करुन योग्य आक्षेप व सुचनांचा अंतर्भाव करण्यात आला, व दि.28 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हाधिकारी यांनी अंतीम आराखडयाचे सादरीकरण केले.
सदरील आराखडा जिल्हाधिकारी यांनी शासनाकडे पाठविला असून पुढील 10 दिवसात या प्रस्तावास मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीची मान्यता मिळेल, असा विश्वास आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे. महाद्वाराजवळच दर्शन मंडळ निश्चीत करण्यात आला असुन प्रवेश मार्ग व बाहेर जाण्याचा मार्ग देखील महाद्वारातूनच ठेवण्यात आलेला आहे.