नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग येथील डॉ. रामदास ढोकळे यांची लोहारा येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी नेमणुक झाली आहे. डॉ. रामदास ढोकळे यांची प्राचार्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल नळदुर्ग शहर पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
डॉ. रामदास ढोकळे हे यापुर्वी नळदुर्ग येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात रसायनशास्त्राचे प्राध्यापक, विभागप्रमुख व उपप्राचार्य म्हणुन 36 वर्षे सेवा केली आहे.त्याचबरोबर त्यांनी विद्यापीठाच्या विविध समित्यावर कार्य केले आहे.एक कार्यतत्पर व आदर्श शिक्षक म्हणुन त्यांचा विद्यापीठ कार्यक्षेत्रात नावलौकीक आहे.त्यांनी घडविलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत.संशोधनाच्या माध्यमातुन त्यांनी राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय परीषदांमध्ये संशोधन कार्य सादर करून विविध पुरस्कार प्राप्त केले आहेत.डॉ. रामदास ढोकळे यांनी शिक्षण क्षेत्राबरोबरच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून नावलौकीक मिळविला आहे.महाराष्ट्र शासन विद्यापीठस्तरीय राष्ट्रीय सेवा योजना उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी,ग्रामिण भागात रक्तदान शिबीर आयोजन,संशोधन आपत्ती व्यवस्थापन व इतर सेवाभावी संस्थानच्या पुरस्काराचे ते मानकरी ठरले आहेत.राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराच्या राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध शिबिरांमध्ये त्यांनी आपला सहभाग नोंदविला आहे.राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातुन आलियाबाद या दत्तक गावात केलेल्या कार्याची दखल घेऊन केंद्र व राज्य सरकारने आलियाबाद ग्रामपंचायतीला ग्रामस्वच्छता अभियान,निर्मल ग्राम, तंटामुक्त गाव या पुरस्काराने सन्मानित केले आहे.त्यांनी गोरगरीब विद्यार्थी तसेच कांही सेवाभावी संस्थाना आर्थिक मदत करून समाजाप्रती त्यांनी ऋण व्यक्त केले आहे.अनाथ विद्यार्थ्यांसाठी कार्य करणाऱ्या नळदुर्ग येथील आपलं घर प्रकल्पासाठी डॉ. रामदास ढोकळे यांनी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातुन निधी उपलब्ध करून देण्याचे एक चांगले कार्य केले आहे.
डॉ. रामदास ढोकळे हे अष्टपैलु व्यक्तिमत्व म्हणुन ओळखले जातात.आता त्यांची प्राचार्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल संस्थेचे सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण,संस्थेचे अध्यक्ष प्रकाश सोळंके,प्रदीप चव्हाण व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष प्रा. सतीश इंगळे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर नळदुर्ग शहर पत्रकार संघाच्या वतीने डॉ. रामदास ढोकळे यांची प्राचार्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून त्यांचा गौरव केला आहे.