नळदूर्ग(प्रतिनिधी)- जिल्ह्यातील सामाजिक संस्थांनी केलेल्या समाज हिताच्या कार्याचा गौरव व्हावा व कार्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून महाराष्ट्र शासन दरवर्षी उत्कृष्ट सामाजिक संस्थांना पुरस्कार देते.
धाराशिव जिल्ह्यातील सन 2022- 23 यावर्षीचा पुरस्कार,पोलीस परेड मैदानावर वात्सल्य सामाजिक संस्थेला देण्यात आला. पालकमंत्री तानाजीराव सावंत, जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे,पोलीस अधीक्षक संजय जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मराठवाडा मुक्ती दिनावेळीच्या ध्वजारोहणानंतर सदरील पुरस्कार प्रदान करण्यात आला. गौरवपत्र,सन्मानचिन्ह व पन्नास हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती याची छाननी करते. समाजाच्या सर्वांगीण क्षेत्रात काम करणाऱ्या सक्रिय संस्थांचीच समिती निवड करते यासाठी अत्यंत काटेकोर नियमावली व पारदर्शकता पाळली जाते. आकांक्षित व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा अशी ओळख असलेला धाराशिव आहे पण मागील काही वर्षापासून प्रशासन व जिल्हावासीय यांच्या योगदानातून ही प्रतिमा बदलत आहे.जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात विधायक-सक्रियपणे काम करणाऱ्या सामाजिक संस्थांची भूमिका महत्त्वाची आहे.समाजातील विधवा,परित्यकता,एकल महिला,तसेच गोसंवर्धन,आरोग्य,वृक्ष लागवड व संवर्धन,अनाथ मुलांसाठी शैक्षणिक कार्य अशा विविध क्षेत्रात काम करून वात्सल्य सामाजिक संस्थेने आपले वेगळेपण निर्माण केले आहे.