भूम (प्रतिनिधी)- भूम आगार हे प्रवाशांना चांगल्या सेवा देणारे दिलासादायक आगार आहे. हे आगार निश्चितपणे तक्रार मुक्त राहील. प्रवाशांना तक्रार करण्याची वेळ येणार नाही. ज्या काही प्रवासी व व्यापारी वर्गानी नवीन बसेस सुरू करण्याची तर काही बसेस पुढे चालू करण्याची मागणी केली आहे. ही मागणी देखील लवकरच पूर्ण केली जाईल असा विश्वास विभागीय नियंत्रक अधिकारी विनोद कुमार भालेराव यांनी प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिनी आयोजित कार्यक्रमात बोलताना प्रवाशांना दिला आहे.
भूम एसटी आगाराच्यावतीने प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन आयोजित केला होता. या कार्यक्रमास आवर्जून प्रवासी वर्गाच्या व कामगार वर्गांच्या अडचणी, समस्या जाणून घेण्यासाठी व त्यांचे निराकरण करण्यासाठी धाराशिवचे विभाग नियंत्रक विनोद कुमार भालेराव, विभागीय वाहतूक अधिकारी अभय देशमुख यांनी भूम येथे उपस्थिती दिली. यावेळी आगाराचे आगार प्रमुख दीपक लांडगे हेही उपस्थित होते. भाजपचे जेष्ठ नेते चंद्रकांत गवळी यांनी नवीन बसेस चालू करण्याची मागणी केली. यावेळेस हेमंत देशमुख, चंद्रकांत गवळी, संजय शाळू, श्रीयुत शंकर खामकर आदीसह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हजर होते.