धाराशिव (प्रतिनिधी)-  राज्यातील सर्वात पुरातन मंदिर, अशी ख्याती असलेल्या चौथ्या शतकातील त्रिविक्रम मंदिराच्या जीर्णोद्धार, जतन आणि संवर्धनाचे काम सध्या वेगात सुरू आहे. मंदिरासमोरील सभामंडप पूर्णतः उकलून पुन्हा एकदा दीड हजार वर्षांपूर्वी होता, तसा साकारला जात आहे.  आपण सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे या कामासाठी 2 कोटी 90 लाखांचा निधी उपलब्ध होऊ शकला. त्रिविक्रम मंदिरासह तेर येथील संतश्रेष्ठ गोरोबा काका यांच्या समाधी मंदिरांसह राज्य संरक्षित स्मारक असलेल्या अन्य मंदिर आणि वास्तूंसाठी देखील मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून घेण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

सुरू असलेल्या मंदिर जिर्णोद्धाराच्या कामाची पाहणी केली. काम मुदतीत पूर्ण करण्याबाबत तसेच कामाचा दर्जा योग्य ठेवणेबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या. राज्य शासनाच्या पुरातत्व विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने त्रिविक्रम मंदिराच्या जतन व संवर्धन काम सध्या वेगात सुरू आहे. या कामामुळे तेरच्या विकासातही मोठी भर पडणार आहे. धाराशिव तालुक्यातील तेर येथे असलेले त्रिविक्रम मंदिर हे आजघडीचे राज्यातील सर्वात पुरातन मंदिर आहे. या मंदिराला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त व्हावे, यासाठी सन 2023 साली दोन कोटी 90 लाख रूपयांचा निधी आपण केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे राज्य सरकारने मंजूर केला होता. त्यानुसार प्रत्यक्षात पुरातन काळाचे साक्षीदार असलेल्या त्रिविक्रम मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे मंदिराच्या पुरातन सौंदर्यात भर पडणार आहे. अनेक इतिहास संशोधकांही सध्या येथे आवर्जून भेट देत असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले.

याच मंदिराच्या सभामंडपात बाराव्या शतकात संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, मुक्ताई, सोपानदेव, निवृत्तीनाथ यांचे संतश्रेष्ठ गोरोबा काका यांच्या नेतृत्वाखाली पहिले संतसंमेलन झाले होते. त्रिविक्रम मंदिराच्या गर्भगृहासमोर सातव्या शतकातील लाकडी मंडप आहे. याच लाकडी मंडपात संतमेळा भरला होता. यावेळी पद्माकर फंड, उपसरपंच श्रीमंत फंड,  माजी सरपंच  नवनाथ नाईकवाडी,  विठ्ठल लामतुरे, अजित कदम, संजय धाकपाडे, अर्शद मुलाणी आदींची उपस्थिती होती.

 
Top