भूम (प्रतिनिधी)- येथील इंदिरा नगर भागातील गुलाब भाई शेख मोल मजुरी करून कुटुंब चालवतात.  गुलाब भाई शेख यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याचे व त्यांच्या नातीचे दि.२९ सप्टेंबर रोजी लग्न असल्याचे भूम येथील व्यावसायिक सचिन करळे यांच्या माध्यमातून कपडा बँकेचे संदीप बागडे यांना समजले. यावेळी त्यांनी कपडा बँकेस सहकार्य करणाऱ्या देणगीदारांकडे गुलाब भाई शेख यांची आर्थिक परिस्थिती सांगितली व लगोलग देणगीदाराच्या मदत म्हणून सात हजार पाचशे रुपये जमा केले गेले तरी थोडे पैसे कमी पडत असल्याचे लक्षात येताच संदीप बागडे यांनी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण दादा रणबागुल यांच्याकडे मदतीची मागणी केली व उर्वरित रक्कम त्यांनी तात्काळ जमा केल्याने संसारउपयोगी साहित्य घेणे शक्य झाल्याचे बागडे यांनी सांगितले.  गेल्या ७ वर्षांपासून भूम शहरात कपडा बँकेचे काम सुरू असून कोरोना काळात गरजू कुटुंबाना किराणा वाटप, शिवभोजन थाळी वाटप, ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन काँसनट्रेटर मशीन, तालुक्यातील वाड्या वस्त्यांवर जाऊन स्वच्छ धुवून वापरण्यायोग्य असलेले जुने कपडे देण्यात आले आहेत. तसेच आजतागायत १३ गरजू कुटुंबातील लग्नासाठी संसार उपयोगी संचाचे वाटप करण्यात आले आहे.

गुलाबभाई शेख यांना संच देतेवेळी कपडा बँकेचे संदीप बागडे सर, सचिन करळे, जयेंद्र मैंदरगे उपस्थित होते. यावेळी मदत केलेल्या सर्वांचे आभार गुलाबभाई शेख यांनी मानले.

 
Top