धाराशिव  (प्रतिनिधी) - इंडो एशिया मेता फाउंडेशन भारत नागेश नगरी असती कलश महायात्रा समिती धाराशिव व जम्मुद्दीत बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या तथागत गौतम बुद्ध व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलश महायात्रेचे जिल्ह्यात दि.१५ सप्टेंबर रोजी आगमन होणार आहे. या महायत्रीचे स्वागत करण्यासाठी ठिकठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली असल्याची माहिती महायात्रा समितीचे समन्वयक पृथ्वीराज चिलवंत यांनी दिली.

तथागत गौतम बुद्ध व डॉ महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी कलश महायात्रेस दि.१० सप्टेंबर रोजी पुणे येथून झाली आहे. या महायात्रेत पूज्य भन्ते रेवात महाथेरो (श्रीलंका), पूज्य भन्ते पलामोधम्मो महाथेरो (व्हिएतनाम), देवमित्ता महाथेरो (श्रीलंका), पुज्य भन्ते प्रियदर्शी महाथेरो (भारत), पुज्य भन्ते होआई व्हू महाथेरो (व्हिएतनाम), पुज्य भन्ते वेलीविठीये महाथेरो (श्रीलंका) व पुज्य भन्ते धम्मसार थेरो (महाराष्ट्र) आदींचा समावेश आहे. ही महायात्रा धाराशिव जिल्ह्यात दि.१५ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे दाखल होणार असून या ठिकाणी यात्रेचे स्वागत केल्यानंतर सुरतगाव येथे भिक्षू संघास भोजन दान करण्यात येणार आहे. तर तुळजापूर येथे सकाळी ११ वाजता आगमन व शहरात मिरवणूक काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच धाराशिव शहरात दुपारी १२.४५ वाजता दाखल होणार असून या महायात्रेची मिरवणूक अहिल्यादेवी चौक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक, संत गाडगेबाबा चौक त्रिशरण चौक, अंबाला हॉटेल चौक, आर्य समाज मंदिर चौक मार्गे पुष्पक मंगल कार्यालयपर्यंत काढण्यात येणार आहे. तसेच श्रीलंका व व्हीएतनाम येथील भिक्षू संघाचे भन्ते धम्मदेसणा देणार आहेत. तर याच ठिकाणी अडीच हजार वर्षापूर्वीच्या तथागत गौतम बुद्ध यांच्या अस्थी व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी कलश दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. या महायात्रेमध्ये सर्वांनी सहभागी होऊन दोन्ही महामानवाच्या अस्थिंच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे महायात्रेचे संयोजक पृथ्वीराज चिलवंत, कैलास शिंदे, अरुण बनसोडे, विशाल शिंगाडे, सुनील बनसोडे, नितीन लांडगे, राजन जोगदंड, विनोद जाधव, ऍड रामचंद्र ढवळे, दीपक सरवदे, स्वराज जानराव आदींसह संयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

 
Top