उमरगा (प्रतिनिधी)- तालुक्यातील सिमावर्ती भागात तलमोड येथील अंतरराज्यीय जुगार अड्ड्यावर तसेच डिग्गी येथील शिंदी विक्री अड्ड्यावर पोलिसांनी दोन वेगवेगळे छापे टाकले. दोन्ही छाप्यातील रोख रकमेसह सव्वा चार लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी याप्रकरणी नऊ जुगाऱ्यासह 11 जणांना ताब्यात घेऊन पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साध्या पोषाखात गस्तीवर असलेल्या फिरत्या पोलीस पथकाला तलमोड येथे अर्जुन मुरलीधर साळुंके हा स्वतःच्या घरी अंतराज्यीय तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवित असल्याची गुप्त माहिती मिळाली, त्यानुसार रविवारी दुपारी साडे चारच्या सुमारास साध्या पोषाखातील पोलीस पथकाने घरात सुरु असलेल्या तिर्रट नावाच्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली असता तेथे अर्जून साळूंखे (रा तलमोड) शंकर एकनाथ सुर्यवंशी (रा हंद्राळ), अंगद चंद्राम मंडले (रा तलमोड), शिवराज भास्कर सुर्यवंशी (रा कोळसुर-गुं), लक्ष्मण लिंगाप्पा सास्तूरे, मोहन नारायण व्हनाळे, चंद्रकांत गुलाब सास्तुरे, संजीव राम शिरसे (चौघेही रा धाकटीवाडी ता उमरगा) व रंजित वाडीकर (रा उरळी ता बसवकल्याण जि बिदर) हे सर्व ग्रुप करुन स्वतःच्या फायद्यासाठी पत्त्यावर पैसे लावून गोलकारात बसुन तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवित असल्याचे आढळून आले. त्यांच्याकडून 51 हजार 100 रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, 08 मोबाईल, तीन दुचाकी सह एकूण 2 लाख 64 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तत्पूर्वी पोलीस पथकाने डिग्गी शिवारात दुपारी अडीचच्या सुमारास विनापास, विनापरवाना बेकायदेशीर रित्या सुरू असलेल्या शिंदी विक्री अड्ड्यावर छापा टाकला. या छाप्यात 1 लाख 52 हजार रुपये किंमतीची 1 हजार 900 लिटर शिंदी जागीच नष्ट करीत अड्डा उध्वस्त केला. याप्रकरणी उसनय्या मारुती तेलंग, विठ्ठल संगमेश्वर वाघमारे (दोघेही रा डिग्गी) यांना अटक करण्यात आली. या दोन्ही कारवाईतील 11 जणा विरोधात पोलिस नाईक नवनाथ भोरे यांनी दिलेल्या दोन वेगवेगळ्या फिर्यादीवरून उमरगा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक यासीन सय्यद करीत आहेत.
पोलीस उपअधीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अश्विनी भोसले, सपोनि श्रीकांत भराटे, पांडुरंग कन्हेरे, पोउपनि गजानन पुजरवाड, पोलीस नाईक नवनाथ भोरे, यासीन सय्यद यांच्या पथकाने हि कामगिरी केली.