धाराशिव (प्रतिनिधी)- येत्या काही दिवसात जिल्ह्यात गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद हे सण उत्सव साजरे करण्यात येणार आहे.हे सण-उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी या काळात जिल्ह्यात जातीय सलोखा,शांतता आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रत्येकाने आपाआपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडाव्यात.अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी दिल्या.

जिल्ह्यात आगामी काळात साजरा होणाऱ्या गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद या सणानिमित्त जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक शनिवार,31 ऑगस्ट रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन सभागृह येथे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी डॉ.ओंबासे बोलत होते.या बैठकीला पोलीस अधीक्षक संजय जाधव,अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन,उपजिल्हाधिकारी संतोष भोर उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

जिल्ह्यात 7 ते 17 सप्टेंबर या कालावधीत श्री.गणेशोत्सव आणि 16 सप्टेंबर रोजी ईद- ए- मिलाद हे सण साजरे होणार आहेत.या सण-उत्सव काळात जातीय सलोखा,शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी या दृष्टीने सर्वांनी पोलिस प्रशासनास सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी यावेळी केले.

ईद-ए-मिलाद जुलूस कमिटी धाराशिव शहर यांनी 16 सप्टेंबर रोजी जुलूस मिरवणूक न काढता 19 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जननंतर मिरवणूक आयोजित केली आहे.त्यामुळे प्रशासनावरील ताण कमी होऊन दोन्ही सण-उत्सव शांततेत पार पडणार आहे.याबाबत जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी जुलूस कमिटीचे कौतुक केले. बैठकीच्या शेवटी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे व जिल्हा पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी सर्वांना गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी सर्व उपविभागीय अधिकारी,सर्व तहसीलदार,विविध गणेश मंडळाचे अध्यक्ष तसेच ईद-ए-मिलाद कमिटीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

 
Top