उमरगा (प्रतिनिधी)-  शहर व तालुक्यात साजरा होणारा गणेशोत्सव, ईद ए मिलाद व इतर सण उत्सव शांततेत साजरा करता यावे, या दरम्यान कोणत्याही परिस्थितीत कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये याकरिता गुंडांच्या हद्दपारीसह तब्बल 300 जणांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. दरम्यान शहरात पोलीस दलातर्फे शुक्रवारी, (दि 06) सकाळी जोरदार शक्ति प्रदर्शन करण्यात आले. यामुळे अनेकांच्या मनात धडकी भरल्याचे पहायला मिळाले.

शहर व तालुक्यात आगामी काळात साजऱ्या होणाऱ्या गणेश उत्सव, ईद ए मिलाद, नवरात्र उत्सव, दिपावलीसह सर्व सण उत्सव शांततेत पार पाडावेत. या दरम्यान कुठल्याही जाती धर्मात तेढ निर्माण होवू नये. सण उत्सव सर्व समाज घटकांनी एकत्रीत रित्या आंनदाने साजरे करावे. शांतता नांदावी, कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, समाज विघातक तसेच असामाजिक प्रवृत्तींमुळे समाजात धार्मिक असहिष्णुता पसरुन सार्वजनिक शांतता भंगाच्या दुर्देवी घटना देशभरात यापुर्वी अनेकदा घडल्या आहेत. येणाऱ्या आगामी काळात साजरे होणारे सण उत्सव शांततेत साजरे केले जावेत. या दरम्यान समाज कंटकांकडून सार्वजनिक शांततेचा भंग होवू नये. त्यांच्यावर जरब निर्माण व्हावी आणि कायदा व सुव्यवस्था आबाधित राहवी, यासाठी पोलीस दलाच्या वतीने पथसंचलन करण्यात आले. यात पोलीस उपअधीक्षक सदाशिव शेलार, पोलिस निरीक्षक अश्विनी भोसले, सपोनि श्रीकांत भराटे, पोउपनि गजानन पुजरवाड, पोहेकॉ अतुल जाधव, शिवलिंग घोळसगावे, अनुरूद्र कावळे, पोकॉ नवनाथ भोरे, यासीन सय्यद, शुभम दिवे, बाबा कांबळे आदिसह पोलिस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान, एनसीसीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. पथसंचलनामुळे अनेकांचे धाबे दणाणून गेले आहेत.

दरवर्षी सर्वत्र सण उत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी समाजातील गुंड प्रवृत्तीला आळा घालणे पोलिसांसमोर मोठे आव्हान असते. यावर्षी पोलीसांनी हद्दीतील गुंड, रेकॉर्ड वरील गुन्हेगारांची यादी तयार करून आतापर्यंत दोन गुंडांना हद्दपार केल आहे. तर दारूबंदी कायद्यानुसार 36 तसेच वेगवेगळ्या कलमान्वये तब्बल 309 विरूद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. यात आणखी वाढ होणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. 

 
Top