धाराशिव (प्रतिनिधी) - 23 गावातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण असलेल्या निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेची दुरुस्ती आता दृष्टीपथात आहे. डॉ. पद्मसिंह पाटील यांनी भगीरथ प्रयत्न्याने केलेला हा प्रकल्प पुन:कार्यान्वित करण्याची जबाबदारी आपली आहे. ठाकरे सरकारच्या भूमिकेमुळे सुरुवातीच्या अडीच वर्षात या प्रकल्पाच्या दुरूस्ती बाबत काहीच हालचाल झाली नाही. मात्र आता 113 कोटी रूपयांच्या दुरूस्ती प्रस्तावास तांत्रिक मान्यता मिळाली आहे. लवकरच अशक्यप्राय वाटणाऱ्या या कामास प्रशासकीय मान्यताही मिळेल, असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे. धाराशिव तालुक्यातील करजखेडा चौरस्त्यावर परिसरातील शेतकऱ्यांसोबत आमदार पाटील संवाद साधत होते.
या महत्वपूर्ण योजनेच्या दुरुस्तीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपण स्वतः भेटून निधी उपलब्ध करून देण्यासंबंधी नोव्हेंबर 2022 मध्ये विनंती केली होती. त्यानुसार उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जलसंपदा विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. पाच टप्याची असणारी ही योजना गेली अनेक वर्षे बंद असल्याने स्थापत्य, विद्युत व यांत्रिकी या तिन्ही विभागाची दुरुस्ती आवश्यक होती. या तिन्ही विभागांकडून अंदाजपत्रक तयार करून घेणे मोठे जिकिरीचे काम होते. अनेक त्रुटींची पूर्तता करून या तिन्ही विभागाच्या समन्वयाने निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेच्या रु.113 कोटी अंदाजपत्रकीय किमतीच्या कामास तांत्रिक मान्यता मिळवून घेतली आहे.
यावेळी भाजपा जिल्हा संयोजक नेताजी पाटील, तालुकाध्यक्ष राजाभाऊ पाटील, अहमद पठाण, बालाजी गावडे, लिंबराज साळुंके, भारत डोलारे, वसंत खटके, बलभीम भोसले, लक्ष्मण चव्हाण, राजेंद्र शिंदे, दगडू भोसले, बिभीषण साळुंके, सुधीर भोसले यांच्यासह बहुसंख्येने परिसरातील शेतकरी उपस्थित होते.