परंडा (प्रतिनिधी)- येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा. गे. शिंदे महाविद्यालय परंडा येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै.रामचंद्र गेनुजी शिंदे (गुरुजी) यांची शंभरावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. संस्थेचे सचिव संजय निंबाळकर व अध्यक्ष सुनील शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव यांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन करत ही शंभरावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करत असल्याचे सांगितले आहे.
सालाबाद प्रमाणे याही वर्षी दिनांक एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर या जयंती सप्ताहामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये दि.2 सप्टेंबर रोजी प्रतिमापूजन तर 3 सप्टेंबर रोजी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा प्रात्यक्षिक उपक्रम या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून एस एच साळुंखे विस्ताराधिकारी तथा गटशिक्षण कार्यालय भूम व सांगळे यांनी मार्गदर्शन केले. विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी परंडा तहसीलचे तहसीलदार निलेश काकडे, नायब तहसीलदार पांडुरंग माडेकर, महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक रणजीत घाडगे, प्राचार्य डॉ सुनील जाधव यांच्या उपस्थितीमध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये सर्व तालुक्यातील शाळांचा सहभाग होता.
दि.4 सप्टेंबर रोजी आनंदनगरी फण फेअर उपक्रम तसेच दि.5 सप्टेंबर रोजी शैक्षणिक सामाजिक संदेश देणारी कै. रा. गे. शिंदे गुरुजी यांच्या प्रतिमेची भव्य रॅली आयोजित केली आहे .दिनांक 6 सप्टेंबर रोजी भव्य राज्यस्तरीय शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. प्रसिद्ध कृषिरत्न बी बी ठोंबरे अध्यक्ष नॅचरल शुगर व अलाईड इंडस्ट्रीज रांजणी हे कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. दि.7 सप्टेंबर रोजी गुरुजींच्या प्रतिमेचं पूजन करून हा जयंती सप्ताह संपन्न होणार असल्याचे प्राचार्य डॉ सुनील जाधव यांनी माहिती दिली आहे.