धाराशिव (प्रतिनिधी)-  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत आता 30 सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. आता केवळ अंगणवाडी सेविकेमार्फतच अर्ज स्विकारले जाणार आहे. जिल्ह्यातील कोणतीही पात्र महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा प्रशासन विविध यंत्रणांच्या माध्यमातून काम करीत आहे. 10 सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील 3 लक्ष 91 हजार 410 महिलांचे अर्ज या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरले. यामध्ये 2 लक्ष 3 हजार 201 अर्ज संकेतस्थळावर आणि नारीशक्ती दूत अँपवर प्राप्त झालेल्या 1 लक्ष 88 हजार 209 अर्जाचा समावेश आहे.

पात्र ठरलेल्या महिलेला दर महिन्याला 1500 रुपये त्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 14 ऑगस्टपासून पात्र महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याची एकत्र 3 हजार रुपये रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

जिल्ह्यात 3 लक्ष 24 हजार 659 पेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट दिले असतांना पात्र ठरणाऱ्या महिलांची संख्या जास्त आहे. बहुतांश पात्र लाभार्थी महिलांनी अर्ज भरले आहे. उर्वरित पात्र महिलांची अर्ज भरण्याची प्रक्रिया गतिमान झाली आहे. आता 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील कोणतीही पात्र महिला या योजनेच्या लाभापासून आता वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे.

10 सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील 4 लक्ष 2 हजार 441 महिलांनी या योजनेचा लाभ मिळण्यासाठी ऑनलाईन व नारीशक्ती दूत अँपवर अर्ज केले. 3 लक्ष 91 हजार 410 अर्जाना तालुका समित्यांनी मंजुरी दिली आहे.


 
Top