धाराशिव (प्रतिनिधी)-मागील काही दिवसांपासून बांगलादेशमध्ये झालेल्या हिंदू वरील अन्याय अत्याचाराच्या विरोधात धाराशिव शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदुरौद्र मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हा मोर्चा धाराशिव शहरातील राजमाता जिजाऊ चौकातून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाऊन पोहोचला. या मोर्चात भगवे टोप्या धारण केलेले हिंदू बांधव भगवे झेंडे हातात घेऊन सहभागी झाले होते.
सकाळी 11 च्या सुमारास धाराशिव शहरातील राजमाता जिजाऊ चौकातील राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करून या मोर्चाची सुरुवात झाली. हिंदू बांधव श्रीपतराव भोसले हायस्कूल, लेडीज क्लब, आर्य समाज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल झाले.या दरम्यान भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालून सकल हिंदू समाजाच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
धाराशिव शहरातील प्रमुख मार्गावरून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाऊन पोहोचला. या मोर्चानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन सकल हिंदू समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. यात बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी भारत सरकारने प्रयत्न करावेत. तसेच त्यांची सुरक्षा आणि त्यांचे जीव वाचावे यासाठी हस्तक्षेप करण्याची मागणी करून या हिंदूंचे पुनर्वसन करण्यासाठी भारत सरकारने मदत करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे नुकताच श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळून झालेल्या घटनेचा सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध नोंदवून हा पुतळा त्वरित उभारावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ही या निवेदनात सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली.