धाराशिव - (प्रतिनिधी)- उज्ज्वल भवितव्यासाठी वेळेचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या विद्यार्थी जीवनात आपल्याला मिळालेल्या वेळेचा योग्य प्रकारे सदुपयोग करुन चांगल्या प्रकारे करिअर घडविता येते. अभ्यास, खेळ व इतर छंद याकरिता वेळेच्या नियोजनावर प्रत्येक विद्यार्थ्याने लक्ष दिले पाहिजे. तरच तुम्ही आयुष्यात यशस्वी व्हाल, असे मत प्रेरक वक्ते डॉ.अर्शद सय्यद यांनी व्यक्त केले.

आळणी-गडपाटी येथील आर.पी.औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी व्यक्तीमत्त्व विकास, वेळेचे नियोजन, मुलाखत आणि करिअर मार्गदर्शन या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ.अर्शद सय्यद बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ शेख गाजी, अब्दुल्ला ख़ान, जुबेर ख़ान, कामरान जिकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यशाळेत डॉ.अर्शद सय्यद यांनी विद्यार्थ्यांना करिअरबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. महाविद्यालयात अभ्यास करताना वेळेचे नियोजन कसे करावे, मुलाखत देताना कोणती पूर्वतयारी करावी, अभ्यास करत असताना आपले मन विचलित होणार नाही याकरिता मनःस्थिती कशी असावी यासह विविध विषयांबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना देखील त्यांनी समर्पक उत्तरे दिली. कार्यशाळेस औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील द्वितीय व तृतीय वर्षाचे विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.

 
Top