धाराशिव (प्रतिनिधी)-जर्मन देशात कुशल कारागिर व अन्य रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्या देशात जाण्यासाठी प्राथमिक स्वरूपाची जर्मन भाषा येणे आवश्यक आहे. त्यामुळे उस्मानाबाद शहरातील पाच ठिकाणी जर्मनी भाषा प्रशिक्षण केंद्र सुरू करणार असल्याची माहिती डायटचे प्राचार्य डॉ. जटनुरे सर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सोमवार दि. 19 ऑगस्ट रोजी झालेल्या या पत्रकार परिषदेस प्रा. डॉ. शोभा मिसाळ, प्रा. डॉ. अंजली सुर्यवंशी, प्रा. मिलिंद आघोर व शिक्षण विस्तार अधिकारी जंगम उपस्थित होते. प्रा. जटनुरे यांनी सांगितले की, ऑनलाईन पध्दतीने हे वर्ग चालवले जाणार आहेत. नाव नोंदणीसाठी दिलेल्या लिंकवर नाव नोंदणी करावी. शिक्षक सुध्दा नाव नोंदणी करू शकतात. त्यानंतर त्यांना प्रशिक्षक म्हणून नेमण्यात येईल. जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग या राज्याशी महाराष्ट्र शासनाने दि. 25 फेब्रुवारी 2024 रोजी सामंजस्य करार केला आहे. कुशल कारागिर व बेरोजगार यांना जर्मन देशात नोकरी करायची असेल तर प्राथमिक स्वरूपाची जर्मनी भाषा येणे आवश्यक आहे. मल्टी जॉब जर्मनीमध्ये उपलब्ध असल्याचेही सांगितले.
धाराशिव शहरात मल्टीपर्पज हायस्कूल मुलींचे येथे दोन तर मल्टीपर्पज हायस्कूल मुलांचे येथे ही दोन व डायट कॉलेज येथे एक या प्रमाणे जर्मन प्रशिक्षण केंद्र धाराशिव चालू करणार असल्याचे सांगितले.